ठाणे: निवडणूक लागली की दोन गोष्टी हमखास दिसतात, एक शिंदेंचं दिल्लीला जाणं आणि शिंदेंच्याच बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात भाजपने पंगा घेणं. आताही तेच सुरू आहे. सध्या विधान परिषद निवडणुकीसाठीही ठाण्यात शिवसेना विरुद्ध भाजप सामना सुरू आहे. पण अशी कोणती ती भळभळती जखम भाजपच्या मनात आहे की ज्यावरून आजही निवडणुका लागल्या की भाजप ठाण्यात दावा करायला सुरूवात करते. याचविषयी समजून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT
ही जखम आहे लोकसभा मतदारसंघाची...
आताचा ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि 2009 पूर्वीचा ठाणे लोकसभा मतदारसंघ वेगळा होता. 2009 पूर्वी ठाणे हा देशातील दुसरा मोठा लोकसभेचा मतदारसंघ होता. ठाणे जिल्ह्यातलाच कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघ आधी ठाण्याचाच भाग होता. 1962 मध्ये अस्तित्वात आलेल्या ठाणे लोकसभा मतदारसंघावर पहिले काँग्रेसचे सोनुभाऊ बसवंत निवडून गेले. त्यानंतर मात्र इथे जनता पार्टी-भाजपचा वरचष्मा होता. रामभाऊ म्हाळगी, राम कापसेंसारख्या अभ्यासू नेत्यांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं.
हे ही वाचा>> समजून घ्या: रूपया आपटला, EMI घेतलेल्यांची आता पार लागणार वाट?
मात्र 1996 च्या लोकसभा निवडणुकीत आनंद दिघेंनी ठाणे लोकसभेवर शिवसेनेचा दावा ठोकला. मराठीच्या मुद्द्यानंतर हिंदुत्वाकडे आपली कूस बदललेल्या शिवसेनेची ठाणे जिल्ह्यात ताकद वाढतेय, ठाणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये भाजपपेक्षा सेनेचे नगरसेवक जास्त असल्याने या जिल्ह्यात शिवसेनेचं प्राबल्य आहे या जोरावर ठाणे मतदारसंघावर शिवसेनेचा दावा असेल अशी भूमिका शिवसेनेचे तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघेंनी घेतली.
आनंद दिघेंची हीच मागणी बाळासाहेबांनीही पुढे लावून धरली आणि युतीच्या जागावाटपात ठाण्यात विद्यमान खासदार भाजपचे असूनही युती टिकवण्यासाठी प्रमोद महाजनांनी ठाण्याच्या जागेवर पाणी सोडलं. जागा शिवसेनेकडे गेल्याने भाजपने राम कापसेंना राज्यसभेवर पाठवलं. त्याही वेळेला भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं आताचे भाजपचे नेते सांगतात. राम कापसेंसारखा नेता, नगरसेवक-आमदारकी ते खासदारकीपर्यंत प्रवास केलेल्या नेत्याची सिटिंग सीट सेनेला सोडावी लागल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाराजी होती.
हे ही वाचा>> समजून घ्या: कच्चं तेल स्वस्त झालं तरीही पेट्रोल-डिझेल का महाग... सरकार का करतंय असं?
आता 1996 ला शिवसेनेला जागा सुटल्यानंतर 96 ते 2004 सलग सेनेचे प्रकाश परांजपे तिथून निवडून आले, आणि सलग 4 वेळा सेनेचा खासदार आल्यानंतर भाजपनेही पुढे या जागेवर दावा केला नाही. पण 2008 नंतर सेनेचे आनंद परांजपे त्यानंतर 2009 ला राष्ट्रवादीचे संजीव नाईक ठाण्यातून खासदार झाले. 2014 पासून सेनेनं पुन्हा कमबॅक केलं आणि 2014-19 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत सेनेचे राजन विचारे निवडून आले. दुसरीकडे 2009 ला झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेत ठाणे आणि कल्याण-डोंबिवली असे 2 मतदारसंघ तयार करण्यात आले.
नव्याने झालेला कल्याण लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडेच गेला. आणि 2014 पासून तिथेही सेनेचे श्रीकांत शिंदे खासदार आहेत. त्यामुळे कधीकाळी जनता पार्टी-भाजपचा दबदबा असलेल्या ठाण्यात शिवसेना चांगलीच रूजली. पण 2014 नंतर भाजपने महाराष्ट्रात चांगलाच जम पकडला आणि ठाणं जिथे कधीकाळी आपणच स्ट्राँग होतो तो मतदारसंघ पुन्हा गळ्यात पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले.
शिवसेना फुटीनंतर ह्यात भाजपला संधी दिसली. 2024 च्या लोकसभा, विधानसभा आणि अगदी नगरपरिषद, महापालिका निवडणुकांवेळीही ठाणे जिल्ह्यात सेना-भाजपत भांडणं झाली. ठाणे म्हटलं की शिवसेना आणि शिवसेना फुटीनंतर ठाणे म्हटलं की एकनाथ शिंदे हे समीकरण झालंय, त्यातच भाजपने महाराष्ट्र अध्यक्षपदही रवींद्र चव्हाणांच्या रूपाने ठाणे जिल्ह्यातच दिलं. त्यामुळे भाजपला तिथं चांगलं बळ आहे. अनेक जण बोलतात की भाजपला संख्येचं गणित कळतं आणि त्यानेच फरक पडतो. त्यानुसार आता ठाणे जिल्ह्यात भाजपचे ९ तर शिवसेनेचे पाच आमदार आहेत.
1. डोंबिवली - रवींद्र चव्हाण (भाजप)
2. ठाणे - संजय केळकर (भाजप)
3. ऐरोली - गणेश नाईक (भाजप)
4. बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)
5. कल्याण पूर्व - सुलभा गायकवाड (भाजप)
6. मिरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप)
7. उल्हासनगर- कुमार आयलानी (भाजप)
8. भिवंडी पश्चिम - महेश चौगुले (भाजप)
9. मुरबाड - किसान कथोरे (भाजप)
हेच आता शिवसेनेचे आमदार पाहिलेत तर
1. कोपरी-पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
2. ओवळा-माजिवाडा - प्रताप सरनाईक
3. कल्याण पश्चिम - विश्वनाथ भोईर
4. अंबरनाथ (SC)- बालाजी किणीकर
5. भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे
लोकसभेचं चित्र पाहिलं तरी ठाणे जिल्ह्यात
1. ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना)
2. कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना)
3. भिवंडी - सुरेश म्हात्रे (राष्ट्रवादी SP)
त्यामुळे संख्याबळात असं नाहीये की शिवसेना एकदमच कमजोर दिसतेय, महापालिका निवडणुकीतही ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर मनपावर सेनेचा महापौर आहे तर मिरा-भाईंदर, नवी मुंबईत भाजपचा महापौर झालाय. त्यामुळे ठाणे जिल्ह्यात सत्तेची, वर्चस्वाची रस्सीखेच सेना-भाजपत सुरूच असते, त्यापलिकडे कार्यकर्ते, नेत्यांची फोडफोड, स्थानिक नेत्यांमध्ये वादही सुरूच राहणार.
ADVERTISEMENT











