संजय राऊत ‘तसं’ बोलून फसले! राणेंसारखी पुन्हा ‘जेल’वारी घडणार?
शिंदे फडणवीस सरकार हे बेकादेशीर आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आणि पोलिसांनी त्यांचे आदेश मानू नयेत, असं विधान संजय राऊतांनी केलं. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यावर नारायण राणे यांच्याप्रमाणे कारवाई होऊ शकते, असं म्हटलं जात आहे.
ADVERTISEMENT

संजय राऊत यांना शिंदे-फडणवीस सरकारबद्दल बोलणं चांगलंच अंगलट आलंय. सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिंदे-ठाकरे गटात नव्यानं वाकयुद्ध सुरू झालंय. याच वाकयुद्धानं संजय राऊतांच्या अडचणी वाढल्यात. त्यामुळेच राऊतांचाही नारायण राणे होणार का? अशी चर्चा सुरू झालीये. राऊत असं काय बोलले की, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि राऊतांचा राणे होणार का? हे प्रश्न उपस्थित झालाय.
सुप्रीम कोर्टानं 11 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाचा निकाल दिला. स्वतः राजीनामा दिल्यानं उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणं शक्य नसल्याचं सुप्रीम कोर्टाच्या पाच सदस्यीय घटनापीठानं सांगितलं. त्याचवेळी कोर्टानं विधानसभा अध्यक्ष आणि राज्यपाल यांची कृतीही बेकायदेशीर ठरवली. त्यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप केला.
नाशिकमध्ये संजय राऊत काय बोलले होते?
“कुणीही कितीही बदनाशी करण्याचा प्रयत्न केला, तरी सर्वोच्च न्यायालयाची लक्ष्मण रेषा डावलून त्यांना पुढे जाता येणार नाही. हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. म्हणून राज्यातील प्रशासन आणि पोलिसांना माझं आवाहन आहे की, बेकायदा सरकारचे बेकायदा आदेश पाळू नका. तुम्ही अडचणीत याल. बेकायदेशीर सरकारचे बेकायदेशीर आदेश जर पाळाल, तर तुम्ही अडचणी याल. तुमच्यावर खटले दाखल होतील. शिंदे-फडणवीस कुणी काही म्हणू द्या. त्यांचे पोपटलाल काही म्हणू द्या. हे सरकार जातंय”, असं संजय राऊत नाशिक येथे बोलताना म्हणाले होते.
हेही वाचा >> …म्हणून उद्धव ठाकरेंची साथ सोडली, गुलाबराव पाटलांनी सगळंच सांगितलं
पण राऊतांना हीच भूमिका मांडणं अंगलट येताना दिसतेय. शिंदे सरकारचे आदेश ऐकू नका, असं सांगणाणाऱ्या संजय राऊतांविरोधात नाशिक पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल केलाय. आयपीसीच्या कलम 505/1 (ब) नुसार पोलिसांप्रती अप्रितीची भावना निर्माण करणे, चिथावणे या आरोपाखाली हा गुन्हा नोंद झालाय.










