माजी नगरसेवकाच्या हत्येचा बदला, आरोपीच्या भावाला गोळ्या घालून संपवलं, आंदेकर-कोमकर गँगवॉर; काय काय घडलं?
Pune Crime : वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावाला गोळ्या घालून संपवलं, पुण्यात गँगवॉर सुरुच
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या भावाला गोळ्या घालून संपवलं
याप्रकरणात चौघांना अटक, पुण्यात गँगवॉर सुरुच
Pune Crime : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचा भाऊ गणेश काळे (वय 32, रा. येवलेवाडी) याची शनिवारी (1 नोव्हेंबर) दुपारी भररस्त्यात गोळ्या झाडून आणि कोयत्याच्या वारांनी हत्या करण्यात आली. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकाजवळ पेट्रोलपंपासमोर साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. दोन दुचाकींवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळीबार केला आणि गणेशच्या डोक्यात कोयत्याने वार केले. चार गोळ्या लागल्याने तो जागीच कोसळला. गणेश हा वनराज आंदेकर हत्येप्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ आहे. या प्रकरणी पोलिसांनी बबलू, तम्मा आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. घटनेनंतर गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, निखिल पिंगळे आणि एसीपी विजय कुंभार यांनी घटनास्थळी धाव घेतली. गणेशचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, गणेश दुपारी रिक्षा चालवत येवलेवाडीहून खडीमशीन चौकाच्या दिशेने येत होता. त्याच्यापाठी दोन दुचाकींवरून चार जण आले होते. पेट्रोलपंपाजवळ त्यांनी त्याची रिक्षा अडवून गोळीबार केला. मानेत, छातीत आणि पोटात गोळ्या लागल्याने गणेश घटनास्थळीच मरण पावला. दोन हल्लेखोरांनी कोयत्यानेही डोक्यावर वार केले. पोलिसांना घटनास्थळी एक दुचाकी सोडलेली आढळली. आरोपी चारही जण एका दुचाकीवरून फरार झाले होते. मात्र, रात्री साडेनऊच्या सुमारास त्यांना शस्त्रांसह अटक करण्यात आल्याचे पोलिस उपायुक्त शिंदे यांनी सांगितले. प्राथमिक तपासात चार ते पाच राऊंड फायर झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नसले तरी पोलिसांच्या मते गँगवॉरमधून ही घटना घडली असावी.
हेही वाचा : CCTV: निखील कांबळे मागून आला आणि सिद्धारामचा घेतला जीव, कुऱ्हाडीचे वार घालतच बसला.. नेमकं असं घडलं तरी काय?
पुण्यात गँगवॉर सुरुच
5 सप्टेंबर रोजी झालेल्या आयुष कोमकर हत्येनंतर आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील संघर्ष पुन्हा उफाळला होता. त्या घटनेत आंदेकर गटाने वर्चस्वासाठी हल्ला केला होता. आता गणेश काळेच्या हत्येमुळे दोन्ही टोळ्यांतील वैर पुन्हा भडकले आहे. सध्या आंदेकर, कोमकर आणि सोम्या गायकवाड टोळीचे सदस्य तुरुंगात आहेत. दोन्ही गटांवर मकोका कारवाई करण्यात आली असून, आंदेकर टोळीप्रमुख बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर याचे आर्थिक साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. तरीही ही नवीन हत्या पोलिसांच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.










