अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू; पती अन् मुलंही जखमी

मुंबई तक

Ajit Pawar convoy hits a two-wheeler woman dies : अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू; पती अन् मुलंही जखमी

ADVERTISEMENT

Ajit Pawar convoy hits a two-wheeler woman dies
Ajit Pawar convoy hits a two-wheeler woman dies
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीची दुचाकीला धडक

point

महिलेचा मृत्यू; पती अन् मुलंही जखमी

Ajit Pawar convoy hits a two-wheeler woman dies : तेलगाव–धारूर महामार्गावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत जखमी झालेल्या कुसुम विष्णु सुदे (वय 30) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रुग्णालयात सुरू असलेल्या उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने 25 नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. या दुर्घटनेने सुदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे. ही भीषण दुर्घटना 22 नोव्हेंबर रोजी घडली.

अधिकची माहिती अशी की, उपमुख्यमंत्री अजित पवार परतूर येथून औसा येथे प्रचारसभेसाठी जात असताना धूनकवड फाटा (धारूर-तेलगाव मार्ग) परिसरात त्यांच्या ताफ्यातील अग्निशामक दलाच्या वाहनाने समोरून जात असलेल्या दुचाकीला तीव्र धडक दिली. या धडकेत कुसुम सुदेसह त्यांचे पती विष्णु दामोदर सुदे (35) आणि दोन लहान मुली रागिणी (9) व अक्षरा (6) गंभीर जखमी झाले. धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकी अक्षरशः चेंदामेंदा होऊन चारही जण रस्त्यावर फेकले गेले. अपघात पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र सर्वांचीच स्थिती गंभीर असल्याने त्यांना तातडीने लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

हेही वाचा : शाळेत गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून सामूहिक बलात्कार! कुटुंबीय म्हणाले की...

कुसुम सुदे यांना डोक्यासह शरीरावर गंभीर दुखापती झाल्या होत्या. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु सततची प्रकृती खालावत गेल्याने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जाण्याने दोन निष्पाप मुलींसह संपूर्ण घर उध्वस्त झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, पती विष्णु सुदे आणि मुली रागिणी व अक्षरा यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरीकांनी व्यक्त केली आहे. या हृदयद्रावक अपघातानंतर ताफ्यातील वाहनांच्या वेग, सुरक्षितता आणि नियमपालनाबाबत स्थानिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोठ्या ताफ्यांमुळे सर्वसामान्यांना धोका निर्माण होतो, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही होत आहे. सुदे कुटुंबावर अचानक आलेल्या या संकटामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. एका क्षणात संपूर्ण कुटुंब विनाशाच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने सर्वत्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp