Barshi Crime : 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला
Barshi Crime : 14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला, ही घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे घडली.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
14 महिन्यांच्या बाळाला विष पाजलं अन् 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेतला
ही घटना बार्शी शहरातील वाणी प्लॉट येथे घडली
Barshi Crime : बार्शी शहरातील वाणी प्लॉट परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका आईने आपल्या अवघ्या 14 महिन्यांच्या चिमुकल्यास विषारी द्रव्य पाजल्यानंतर स्वतः साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेत मृत झालेल्या विवाहितेचे नाव अंकिता वैभव उकिरडे (वय 25) असे आहे. तिचा 14 महिन्यांचा मुलगा अन्वीक वैभव उकिरडे गंभीर अवस्थेत असून, बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आला आहे. ही हृदयद्रावक घटना 7 नोव्हेंबर रोजी सकाळी सुमारे साडेदहा वाजताच्या सुमारास उघड झाली. अंकिताचा मृतदेह घरातच सापडला असून तिने आत्महत्येसाठी साडीचा वापर केला होता.
आईचा मृत्यू, बाळाची प्रकृती गंभीर
अधिकची माहिती अशी की, अंकिताचे लग्न चार वर्षांपूर्वी वैभव विकास उकिरडे यांच्याशी झाले होते. घटनेच्या वेळी घरातील इतर सर्व सदस्य आपापल्या कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी अंकिता ही आपल्या लहान मुलासह घरात एकटीच होती. नेहमीप्रमाणे सकाळी घरकामासाठी आलेल्या कामगार महिलेला घरात कोणी दिसले नाही, म्हणून तिने खिडकीतून डोकावून पाहिले असता, अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली, तर चिमुकला अत्यवस्थ पडलेला होता.
घाबरलेल्या महिलेने तत्काळ शेजाऱ्यांना आणि नातेवाइकांना माहिती दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पोलिसांना कळवले. माहिती मिळताच बार्शी शहर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. मुलास तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हेही वाचा : नितीन गडकरींसमोर खुर्ची मिळवण्यासाठी महिलेला चिमटे काढणाऱ्या 'त्या' महिला पोस्ट मास्तर जनरलचं निलबंन










