Kiran Samant : उदय सामंतांच्या भावाच्या स्टेट्सला ठाकरेंची मशाल, कारण काय?
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. किरण सामंत यांनी व्हॉट्सअॅप स्टेट्सला मशाल हे निवडणूक चिन्हाचा फोटो ठेवला होता.
ADVERTISEMENT

Uday Samant Brother Kiran samant whats app status : राज्याचे उद्योगमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील महत्त्वाचे नेते उदय सामंत यांच्या भावाने ठेवलेल्या व्हॉट्स अप स्टेट्सने खळबळ उडाली. किरण सामंत यांचे नाव आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चेत आहे. त्यातच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मशाल व्हाट्स स्टेट्सला ठेवलं. इतकंच नाही, तर जो होगा, देखा जायेगा असंही म्हटलं. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे.
उदय सामंत यांचे बंधू आणि उद्योजक किरण सामंत यांनी व्हॉट्स अॅपवर स्टेट्स ठेवलं आणि नंतर डिलीट केलं. पण, त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. उदय सामंत हे उद्योगमंत्री आहेत. त्यातच किरण सामंत यांना आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल, असं म्हटलं जात आहे.
किरण सामंत यांचं व्हॉट्स अॅप स्टेट्स काय?
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने पेटती मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. किरण सामंत हे सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहे. पण, त्यांनी जो होगा, देखा जायेगा असं म्हणत मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव असलेला फोटो स्टेट्सला ठेवला.
स्टेट्सला ठाकरेंची मशाल, किरण सामंतांनी काय केला खुलासा?
या स्टेट्सने खळबळ उडाल्यानंतर किरण सामंत यांनी ते डिलीट केले. त्यानंतर ते म्हणाले, “उद्योगमंत्री उदय सामंत यांचं करिअर बाद होऊ नये म्हणून स्टेट्स मागे घेतलं. बेलगाम बोलत आहेत त्यांच्यासाठी हे स्टेट्स होतं.”