‘भाजपने उत्तर द्यायला हवं’, काँग्रेसमध्ये जाण्याबद्दल पंकजा मुंडेंनी सोडलं मौन
मी कोणत्याही पक्षातील नेत्याशी पक्षांतरासंदर्भात चर्चा केली नाही, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला आहे. पंकजा यांनी प्रसिद्ध झालेल्या वृत्तावर हे उत्तर दिले.
ADVERTISEMENT
Pankaja Munde Latest News : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे वृत्त काही माध्यमांतून झळकले. त्यामुळे पंकजा मुंडेंभोवती चर्चेनं फेर धरला होता. यावर आज त्यांनी मौन सोडलं. हे वृत्त देणाऱ्या वृत्तवाहिनीवर आपण मानहानीचा दावा ठोकणार असून, ही माहिती त्यांना कुणी दिली? असा सवाल पंकजांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी भाजपने आपल्याला दोन वेळा उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले, मात्र ऐनवेळी फोन करून थांबवले, असा दावाही पंकजांनी केला आहे.
ADVERTISEMENT
पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांवर उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, “2019 मध्ये मी भाजपची उमेदवार होते. माझा पराभव झाला. त्यानंतर अनेक घटना घडल्या. भाजपकडून अनेक निर्णय घेतले गेले. त्या निर्णयामध्ये मी सामील नसले, मला तिकीट नाही मिळालं. मला उमेदवारी मिळाली नाही, अशा प्रकारच्या निर्णयानंतर नाराज आहे. मी पक्ष सोडणार अशा चर्चा गेले चार वर्षांपासून सुरू आहेत.”
दुसऱ्या पक्षातून आलेल्या ऑफर हलक्यात घेतल्या कारण…
“अनेक कार्यक्रमांमध्ये जिथे मी माझ्या समर्थकांना संबोधित करते, मी अत्यंत स्पष्टपणे माझी भूमिका मांडलेली आहे. परत परत माझी भूमिका मांडणं म्हणजे माझ्या नैतिकतेवर विश्वास सिद्ध करण्यासारखं आहे. काही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी असं काही भाष्य केले की, पंकजा मुंडे आमच्याकडे आल्या तर त्यांना अमूक देऊ, तमूक देऊ. या गोष्टीला मी हलक्यात घेतलं. कारण त्यांनी माझा अपमान केलेला नव्हता”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हे वाचलं का?
वाचा >> Beed : अजित पवारांच्या बंडामुळे धनंजय मुंडे-पंकजा मुंडेंचं मिटलं ‘वैर’!
“परवाच्या दिवशी एक बातमी आली. त्या बातमीने मला अंतर्मुख केले आणि मला वाटलं की बोललं पाहिजे. मी सोनिया गांधी आणि राहुल गांधींची भेट घेतल्याचे त्या बातमीत म्हटलेलं होतं. मी काँग्रेसच्या वाटेवर आहे. प्रश्नचिन्ह देऊन कायदेशीर प्रश्न सोडवू शकता, पण एखाद्याची विश्वासार्हता आणि करिअर संपवण्याचा हा डाव कुणाचा आहे?”, असा प्रश्न पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.
चॅनेलवर मानहानीचा दावा ठोकणार -पंकजा मुंडे
“त्यांनी असंही सांगितलं आहे की, एका सांगलीच्या नेत्याच्या माध्यमातून मी राहुल गांधी आणि सोनिया गांधींना भेटले. माध्यमांना सुद्धा जबाबदारी आहे. त्या चॅनेलवर मी मानहानीचा दावा ठोकणार आहे. त्यांनी जे सांगितलं आहे, त्याचे पुरावे त्यांना कोर्टात द्यावे लागतील. ज्या नेत्याच्या माध्यमातून मी काँग्रेस नेत्यांना भेटले त्याची माहिती त्यांना द्यावे लागेल”, असा इशारा पंकजा मुंडे यांनी दिला.
ADVERTISEMENT
वाचा >> अजितदादांकडून NCP जाणार? सिब्बलांचा मोठा दावा; म्हणाले, “घड्याळ आणि धनुष्यबाण…”
“माझं करिअर कवडीमोलाचं नाही. मी 20 वर्षांपासून राजकारणात काम करते. माझ्या स्पष्टवक्तेपणामुळे आणि प्रामाणिकपणामुळे माझं नेतृत्व आहे. माझ्यावर गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार झालेले आहेत. पाठीत खंजीर खुपसण्याचे रक्त माझ्यात नाही. खुपसलेला खंजीर कसा योग्य आहे, हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. त्यामुळे हा माझा स्वभाव नाही”, असं त्या यावेळी म्हणाल्या.
ADVERTISEMENT
“भाजपने यावर उत्तर द्यायला पाहिजे”
“या चर्चा का होतात, याबद्दल मी माझ्या 3 जूनच्या कार्यक्रमात अत्यंत स्पष्टपणे सांगितले होतं. प्रत्येक वेळी पंकजा मुंडेंचं नाव येत पण, त्या ठिकाणी येत नाही. त्या पदावर दिसत नाही. त्यामुळे या चर्चा होतात आणि हा माझा दोष नाही. यावर उत्तर पक्षाने द्यायला पाहिजे. पंकजा मुंडे पात्र आहेत की, नाही याची उत्तरं मी किती वेळा देणार?”, असा प्रश्न पंकजांनी उपस्थित केला.
वाचा >> NCP चे अध्यक्ष शरद पवार की, अजित पवार? पक्षाची घटना, नियम काय सांगतात?
“भागवत कराडांना राज्यसभा मिळाली. रमेश कराडांना विधान परिषद मिळाली. त्यानंतरही अनेक विधान परिषद निवडणुका झाल्या. जेव्हा जेव्हा माझं नाव चाललं, तेव्हा तेव्हा माझं नाव आलं नाही म्हणून कधीही कुठली टिप्पणी केली नाही. सार्वजनिकरीत्या त्याबद्दल कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. माझ्या भाषणाचे तुकडे काढून अर्थ लावले जातात आणि ते अर्थ समर्पकही बसतात, कारण पंकजा मुंडे का नाही”, असं म्हणत पंकजांनी खडेबोल सुनावले.
“भागवत कराडांच्या यात्रेला मी भगवा झेंडा दाखवला. मी त्यांचा सत्कार केला. ज्या दोन विधान परिषद निवडणुका झाल्या, त्या दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितलं होतं. सकाळी 9 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करायला या म्हणून सांगितलं गेलं. त्यानंतर मला फोन करून सांगितलं गेलं की तुम्ही हे फॉर्म भरायचा नाही. जशी तुमची आज्ञा असं म्हणून पक्षाचा प्रत्येक आदेश शिरसावंद्य मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात काय केलं म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. या चॅनेला माहिती कुणी दिली? ही माहिती का दिली? या माहितीचं असे मुहूर्त का गाठले जातात. अशा वेळी माझ्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो”, असं भाष्य पंकजा मुंडेंनी भूमिका मांडताना केलं.
“राजकारण करेन किंवा नाही करेन. कधी करेन, कुणाशी करेन हा माझा विषय आहे. पण, राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतली आहे. मी माध्यमांनाही सांगितलं होतं की, मला जे बोलायचं ते ठणकावून सांगेन आणि मला जे करायचं ते डंके की चोट पे करेन. मी गुपितपणे, अंधारात जाऊन करणार नाही”, असं त्या म्हणाल्या.
“मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशासंदर्भात भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही. सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. ज्यादिवशी बातमी आली, त्यादिवशी मी मध्य प्रदेशात होते. माझा सोशल मीडिया बघा. माझ्या जीवनात पारदर्शकतेला, प्रामाणिकपणाला, स्पष्टवक्तेपणा, न्यायप्रिय भूमिकेला फार महत्त्व आहे. मी नाराज नाही, पण दुःखी आहे”, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT