Aryan khan case : महागडी घड्याळं, परदेशी वाऱ्या; समीर वानखेडेंविरोधात काय सापडलं?
मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतरांवर आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
ADVERTISEMENT

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अर्थात अंमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि इतरांवर आर्यन खान प्रकरणात शाहरुख खानकडून 25 कोटी रुपये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील एनसीबीच्या विशेष तपास पथकाच्या (सेट) तपासात वानखेडे यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर नागरी सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचाही आरोप आहे.
‘इंडिया टुडे’कडे NCB च्या विशेष तपास पथकाचा महत्त्वाचा अहवाल मिळाला आहे. या अहवालाच्या आधारे वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वानखेडे यांचा परदेशी दौऱ्यात लाखोंचा खर्च
प्राप्तिकर विवरणानुसार समीर वानखेडे यांचे वार्षिक सरासरी उत्पन्न 15.75 लाख रुपये आहे. त्यांची पत्नी क्रांती हिचे उत्पन्न सुमारे 7 लाख रुपये आणि वडिलांचे उत्पन्न (पेन्शन आणि भाडे) सुमारे 3.45 लाख रुपये आहे.
2017 ते 2021 या पाच वर्षांत वानखेडे यांनी कुटुंबासोबत ब्रिटन, आयर्लंड, पोर्तुगाल, दक्षिण आफ्रिका आणि मालदीव या देशांमध्ये सहा खासगी परदेश दौरे केले. या 55 दिवसांच्या परदेश दौऱ्यात त्यांनी 8.75 लाख रुपये खर्च केले. यात आश्चर्याची बाब म्हणजे ही रक्कम केवळ विमान प्रवासाच्या खर्चाचीच आहे.