धाराशिव : भाडेकरूला घरमालकाने भाडे मागितले; पण मिळाले सत्तूरचे वार..., धडकी भरवणारा VIDEO
Dharashiv Crime : घरमालकाने भाडे मागितले. मात्र, भाडेकरुने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना धाराशिव जिल्ह्यात घडलीये. या प्रकरणात आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
धाराशिव : भाडेकरूला घरमालकाने भाडे मागितले
पण मिळाले सत्तूरचे वार..., धडकी भरवणारा व्हिडीओ
Dharashiv Crime News : धाराशिव शहरात घरभाड्याच्या वादातून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली असून भाडे मागितल्यावरून झालेल्या वादातून घरमालकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 26 टाके पडल्याने राजाभाऊ स्वामी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाभाऊ शिवाय्या स्वामी यांच्या घरी राजेश अनिल झोंबाडे हा भाड्याने राहत होता. मात्र, मागील दोन महिन्यांपासून त्याने घरभाडे दिले नव्हते. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतर आरोपी चिडचिड करू लागला. घटनेदिवशी भाडे मागितले असता “10 मिनिटे थांबा, मी येतो” असे सांगून तो निघून गेला. 12 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजता भाड्याच्या मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला. “मी पैसे देणार नाही” असे म्हणत आरोपीने शिवीगाळ करत वाद वाढवला. त्यानंतर संतापाच्या भरात त्याने लोखंडी कोयता उचलून राजाभाऊ स्वामी यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. जखमींना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्त्याला 26 टाके पडले असून यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0136/2026 नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध BNS कलम 109, 352, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असून कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहल करत आहेत.
घटनेचा व्हिडिओ समोर
या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला असून घरमालक मागील दोन महिन्यांपासून थकलेले भाडे द्यावे, अन्यथा जागा खाली करावी असे सांगत आहेत. त्यावेळी आरोपी “ठीक आहे, पण तुम्ही शिव्या दिल्याचे काय करायचे?” असे म्हणत वाद घालतो. त्यावर घरमालक “जा माझ्यावर केस करा” असे सांगतात. याचदरम्यान घरमालक आरोपीला “बाळा, जास्त शहाणपणा करू नको” असे समजावत असताना भाडेकरूने सोबत आणलेल्या सत्तूरने एकामागोमाग वार केले. या हल्ल्यात वृद्ध गंभीर जखमी झाले असून त्यांना 26 टाके पडले आहेत. तसेच ते रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.









