कल्याणमध्ये मध्यरात्री अचानक गोळीबार अन् तुफान राडा.. हादरवून टाकणारी घटना
कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटांमधील जुन्या वादातून झालेल्या राड्याचे पर्यवसान गोळीबारात झाले. या धक्कादायक घटनेत राहुल वर्मा हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ADVERTISEMENT

कल्याणः कल्याण पूर्वेतील आत्मानगर परिसरात दोन गटांमधील जुन्या वादाने बुधवार (10 जून) रात्री हिंसक रूप धारण करत थेट गोळीबारापर्यंत मजल मारली. या धक्कादायक घटनेत राहुल वर्मा हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्यरात्री झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नेमकं काय घडलं?
माहितीनुसार, खडेगोळवली येथील आत्मानगर परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडा या दोन गटांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरून दोन्ही गटांमध्ये वारंवार हाणामारी आणि वादाचे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही गट पुन्हा आमनेसामने आले. सुरुवातीला झालेला वाद काही वेळातच हाणामारीत बदलला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.
वादाच्या दरम्यान अचानक गोळीबार झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनुसार, तब्बल तीन राऊंड फायरिंग करण्यात आले. या गोळीबारात राहुल वर्मा हा तरुण गंभीर जखमी झाला. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली, तर अनेकांनी सुरक्षिततेसाठी घराबाहेर पडणे टाळले.
घटनेची माहिती मिळताच कोळशेवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी राहुल वर्मा याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.









