कॉमेडियन राजू श्रीवास्तव याचं निधन; उत्तम अभिनेता ते राजकारणी असा प्रवास

सुप्रसिद्ध स्टँण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं अखेर दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे.
Raju Srivastav
Raju Srivastav

नवी दिल्ली: सुप्रसिद्ध स्टँण्डअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. १० ऑगस्टला दिल्लीत जिममध्ये व्यायाम करताना राजू श्रीवास्त यांच्या छातीत दुखू लागल्याने ट्रेडमिलवरच कोसळले, त्यानंतर त्यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यानंतर राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर होते. मात्र आज राजू श्रीवास्तव यांचं दुखद निधन झालं.

राजू श्रीवास्तव यांचा उत्तम अभिनेता ते राजकारणी असा प्रवास

राजू श्रीवास्तव, ज्यांना गजोधर आणि राजू भैया म्हणूनही ओळखले जाते, ते एक उत्तम विनोदी कलाकार, अभिनेता आणि राजकारणी होते. २५ डिसेंबर १९६३ रोजी उत्तर प्रदेशातील कानपुर शहरात त्यांचा जन्म झाला. राजू यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव कवी असल्याने त्यांना बलाई काका म्हणत. राजू सुरवातीपासून नक्कल फार उत्तम करत असल्याने त्यांना कॉमेडियनच व्हायचे होते. १९८२ च्या आसपास त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. बॉलिवूडमध्ये नाव कमवण्यासाठी त्यांनी कानपूरहुन थेट मुंबई गाठली. ऐंशीच्या दशकात एकीकडे हिरोच्या बरोबरीने एक विनोदवीर नट लागत असे. राजू यांनी सुरवातीच्या काळात मनोरंजन क्षेत्रात काम मिळत नव्हते, तेव्हा काही काळ रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह केला होता.

Comedian Raju Srivastava's journey from a great actor to a politician
Comedian Raju Srivastava's journey from a great actor to a politician

राजू श्रीवास्तव यांनी अनेक मालिका, चित्रपटांमध्ये केले काम

राजूंचा पहिला चित्रपट म्हणजे एन चंद्रा यांचा तेजाब, त्यातील बऱ्यापैकी कलाकार हे नवखे होते. चित्रपट सुपरहिट ठरला. पुढे मैने प्यार किया, बाजीगर, आये आठवा खदानी रुपया, बिग ब्रदर, मै प्रेम कि दिवानी हू बॉम्बे टू गोवा यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केले. मात्र राजू यांची खरी ओळख म्हणजे स्टँडअप कॉमेडियन. सुरवातीच्या काळात विनोदी कार्यक्रमांचे त्यांना अवघे ५० रुपये मिळत. ‘टी टाईम मनोरंजन’ या टीव्हीवरील कार्यक्रमातून त्यांनी विनोदी जगात पाऊल ठेवले. राजू यांना सर्वात मोठे यश मिळाले ते द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या स्टँडअप कॉमेडी शोमध्ये, जिथे ते उपविजेते होते. ‘गजोधर भैया’ हे त्यांचे प्रचलित पात्र जे आजही अनेकांच्या लक्षात आहेत. याव्यक्तिरिक्त त्यांनी अमिताभ बच्चन, लालू प्रसाद यादव, राम देव बाबा यांच्या नकला करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच त्यांनी शक्तीमान, बिग बॉस, कॉमेडी का महा मुकाबला, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स विथ कपिल इत्यादी टीव्ही मालिकांमध्ये काम केले.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळालं, पण...

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांना कानपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र ११ मार्च २०१४ रोजी त्यांनी तिकीट परत केले आणि सांगितले की, ‘त्यांना पक्षाच्या स्थानिक घटकांकडून पुरेसा पाठिंबा मिळाला नाही’. त्यानंतर १९ मार्च २०१४ रोजी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. बॉलिवूडमधून त्यांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत होत्या, मात्र राजू यांनी कायमच स्टँडअप कॉमेडीला प्राधान्य दिले. आपल्या प्रेक्षकांना कायमच हसवणारे आणि आपल्या विनोदी स्वभावामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे राजू श्रीवास्तव त्यांच्या विनोदी टायमिंगमुळे त्यांच्या चाहत्यांना कायम स्मरणात राहतील.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in