Sakinaka Rape Case : Cm Uddhav Thackeray यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

जाणून घ्या काय म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी
CM उद्धव ठाकरे
CM उद्धव ठाकरे(फोटो सौजन्य - CMO)

मुंबईतल्या साकीनाका भागात महिलेवर झालेला पाशवी बलात्कार आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड टाकण्यात आला. तसंच तिला मारहाणही करण्यात आली. 9 आणि 10 तारखेच्या पहाटे 3 च्या सुमारास मुंबईला हादरवणारी घटना घडली. या प्रकरणी एकाला अटकही करण्यात आली आहे. या पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

दरम्यान या धक्कादायक घटनेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांची बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी पोलिसांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. या बैठकीत मुंबईची सुरक्षित शहर ही प्रतिमा डागाळू नये यासाठी सतर्क राहा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मुंबईतील साकीनाका भागात महिलेवर झालेला बलात्कार आणि त्यानंतर झालेला तिचा मृत्यू ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. एका महिन्याच्या आत आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करावं, जलदगतीने न्याय काय मिळतो ते नराधमांना दाखवून द्यावं. जेणेकरून पुढे कुणीही अशी हिंमत करणार नाही. उद्यापासून तातडीने या प्रकरणी विशेष सरकारी अभियोक्तांची नेमणूक करून न्यायालयीन खटल्याची तयारी करावी असेही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुंबईची प्रतिमा ही सुरक्षित शहर अशी आहे अशा घटना घडून ती डागाळली जाते याबाबत विशेष खबरदारी घेतली गेली पाहिजे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. तसंच पोलिसांनी अधिक जागरूक राहून उपाय योजना कऱण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या आहेत.

आणखी काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्र्यांनी यावेळी या घटनेतील सर्व न्यायवैद्यकीय, इलेक्ट्रॉनिक पुरावे तसेच साक्षीदारांचे पुरावे व्यवस्थित जमा करून हे प्रकरण न्यायालयात मजबुतीने मांडावे तसेच कुठेही कमतरता राहणार नाही हे पाहण्याचे निर्देश दिले. एक महिन्याच्या आत दोषारोपपत्र दाखल झाले पाहिजे तसेच न्यायालयात खटला उभा राहील त्याची वाट न पाहता उद्यापासूनच विशेष सरकारी अभियोक्ता नियुक्त करून काम सुरु करावे असेही निर्देश दिले.

काय देण्यात आल्या आहेत सूचना?

1) महिलांची वर्दळ असलेली ठिकाणे लक्षात घेऊन पोलिसांनी त्या भागात नियमित गस्त वाढवावी.महिलांवर हल्ले होऊ शकतात किंवा त्यांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवू शकतो अशी शहरांतील हॉटस्पॉट निश्चित करून याठिकाणी गस्त वाढवावी.

2) प्रत्येक पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याचा समावेश असलेले निर्भया पथक स्थापन करून अशा हॉटस्पॉटना त्या पथकांनी दिवस रात्र वेळोवेळी भेटी द्याव्यात.

3) स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने रस्त्यावरील निराश्रित व एकट्या महिलांना सुरक्षित स्थळी हलवावे व अशा ठिकाणीदेखील पोलिसांनी बारकाईने नजर ठेवावी.

4) महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे असलेल्या तसेच तशी पार्श्वभूमी असलेल्या संशयित गुन्हेगारांवर कडक लक्ष ठेवावे.

5) गुन्ह्याची उकल होण्यात सीसीटीव्हीची महत्त्वाची भूमिका असते, त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील कॅमेरे शहरात उर्वरित महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्याची कार्यवाही लगेच सुरु करावी.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in