
महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण तापत असताना आज महाराष्ट्राचे उप- मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही भगवी शाल पांघरली. राज ठाकरे यांच्या भगव्या शालीतील पोस्टर्स सर्वत्र झळकायला लागल्यानंतर आज अजित पवारांनाही भगव्या शालीत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे कारागृहामध्ये अभंग आणि भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे की ही स्पर्धा राज्यातील 27 कारागृहामध्ये भरवली जाणार असून या कारागृहातील कैदी स्पर्धेत सहभाग घेणार आहेत. कारागृहात होणाऱ्या या अभंग व भजन स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते पार पडलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आज या भजन आणि अभंग स्पर्धेचा झेंडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडकवला.
या स्पर्धेत विजयी होणाऱ्या तीन स्पर्धकांना करंडक देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात यावेळी स्पर्धा भरवणारे शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान कडून भजनी मंडळ देखील आले होते. या भजनी मंडळींच्या टाळ आणि मृदुंगाच्या तालावर या उपक्रमाची सुरुवात गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते झाली.
20 मे ते 30 जून या कालावधीत जिल्ह्यातील 27 कारागृहात ही स्पर्धा पार पडणार आहे. यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "या उपक्रमामुळे कारागृहात वातावरण बदलणार आहे. कारागृहातील कैदी है अपराधी असले तरी, ही देखील आपलीच लोकं आहेत. क्षणिक रागाच्या भरात अनेक वेळा त्यांच्याकडून अपराध होत असतात. मात्र समाजानेही त्यांना सुधारण्याची एक संधी दिली पाहिजे. त्यामुळे या स्पर्धेच्या माध्यमातून संत महात्म्यांची उजळणी या कायद्यांना होईल", अशी आशा उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली. या कौतुकास्पद उपक्रमाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी गृहविभागाचे देखील अभिनंदन केलं.