एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना सभागृहातच दिला गर्भित इशारा; करुणा मुंडेंनी घेतली भेट

शिंदे गटाविरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांमध्ये धनंजय मुंडेंचाही समावेश होता, त्याचाच दाखला देत मुख्यमंत्री शिंदेंनी गर्भित इशारा दिला...
karuna sharma-munde, Dhananjay Munde, Eknath shinde
karuna sharma-munde, Dhananjay Munde, Eknath shinde

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी (२२ ऑगस्ट) विरोधक सत्ताधारी यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. विरोधकांनी सत्ताधारी विशेषतः एकनाथ शिंदे आणि ४० बंडखोर आमदारांना डिवचलं. त्यानंतर एकनाथ शिंदेंनीही पलटवार केला. याच राजकीय कलगीतुऱ्यात धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. त्यावर शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत सभागृहातच गर्भित इशारा दिला आणि हे सगळं घडल्यानंतर करुणा मुंडेंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच भेट घेतली.

विधानसभेत धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदेंमध्ये काय घडलं?

नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याच्या विधेयकावर चर्चा झाली. यावर बोलताना धनंजय मुंडे म्हणाले, "आपण सर्व लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सोबतच्या नगरसेवक कार्यकर्त्यांना न्याय व संधी देण्यासाठी प्रयत्न करत असतो. अनेक नगरसेवक मुख्यमंत्र्यांकडे देखील आपल्याला नगराध्यक्ष होण्याची संधी देतील या अपेक्षेने पाहत आहेत. मात्र त्या नगरसेवकांच्या आशेवर मुख्यमंत्र्यांनी पाणी फिरवलं."

"यावेळी सर्व पक्षांना मत दिलेल्या जनतेला आपापले पक्ष सत्तेत आल्याचा आनंद मिळतो आहे. अशीच परिस्थिती समजा नगर परिषद निवडणुकीत झाली, तर पक्ष कोणता अन नगराध्यक्ष कोणाचा अशी विचित्र परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यापुढे निर्णय घ्यायचाच असेल, तर मग मुख्यमंत्र्यांची निवड देखील जनतेतून होऊन जाऊद्या", असं धनंजय मुंडे म्हणाले.

karuna sharma-munde, Dhananjay Munde, Eknath shinde
नगराध्यक्षाची जनतेतून निवड : अजित पवारांचा वार, एकनाथ शिंदेंचा पलटवार; काय घडलं?
त्यानंतर बोलताना धनंजय मुंडेंनी एकनाथ शिंदेंवर प्रहार केला. "महाविकास आघाडी सरकारमध्ये नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी घेतलेला निर्णय आता मुख्यमंत्री झाल्यानंतर बदलावा लागतोय, हे दुर्दैव आहे. राज्याचे नाथ म्हणवणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी एकनाथच राहावं, ऐकनाथ होऊ नये, असा खोचक टोला मुंडेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेत धनंजय मुंडेंना काय दिला गर्भित इशारा?

"काही लोक रोज बाहेर दोनच शब्द बोलत आहेत. दुसरा मुद्दाच नाहीये. परवा काहीतरी ताट वाटी चलो गुवाहाटी. धनंजय मुंडे पण तिकडे होते. इतकं जोरात बोलत होते की, असं वाटतं होतं किती वर्षांचे शिवसैनिक आहेत. बेंबीच्या देठापासून ओरडून बोलत होते. घसा खराब होईपर्यंत तुम्ही बोलले. तुमचा पण सगळा प्रवास मला माहितीये ना. सगळा प्रवास माहिती आहे. त्यावेळी देखील आपल्या देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली. दाखवली ना? त्यामुळे हे जाऊद्या. पण परत परत दाखवता येणार नाही. मी कमी बोलतो. त्यामुळे जास्त काही बोलत नाही", असं एकनाथ शिंदे म्हणाले.

karuna sharma-munde, Dhananjay Munde, Eknath shinde
कुणाच्या चुकीमुळे विनायक मेटेंना गमवावा लागला जीव?; फडणवीसांनी सांगितला घटनाक्रम

देवेंद्रजींनी प्रेम, दया, करुणा दाखवली, पण परत परत दाखवता येणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना इशाराच दिला.

करुणा मुंडे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी थेट विधानभवनात

विधानसभेत दुपारी धनंजय मुंडे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या या कलगीतुऱ्यानंतर सायंकाळी अनपेक्षितपणे करुणा शर्मा-मुंडे या विधानभवन परिसरात पोहोचल्या. विधानभवनात जाऊन करुणा शर्मा-मुंडे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. भेट नेमकी कोणत्या कारणासाठी घेतली, हे कळू शकलं नसलं, तरी एकनाथ शिंदेंनी धनंजय मुंडेंना दिलेल्या अप्रत्यक्ष इशाऱ्याशी याचं कनेक्शन लावलं जात आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in