‘सरन्यायाधीश गोगावले’; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबद्दल शिवसेनेनं सामनात काय म्हटलंय?
शिवसेनेतील फूट आणि सत्ता संघर्षाचा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेला आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी चार ते पाच वर्ष निकाल लागणार नाही, असं विधान केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. गोगावलेंच्या विधानाचा समाचार घेताना शिवसेनेनं महाशक्ती म्हणत भाजपवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. भरत गोगावलेंच्या विधानावर शिवसेनेनं […]
ADVERTISEMENT

शिवसेनेतील फूट आणि सत्ता संघर्षाचा खटला सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाकडे गेला आहे. ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, शिंदे गटाचे प्रवक्ते भरत गोगावले यांनी चार ते पाच वर्ष निकाल लागणार नाही, असं विधान केल्यानं अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. गोगावलेंच्या विधानाचा समाचार घेताना शिवसेनेनं महाशक्ती म्हणत भाजपवरही अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भरत गोगावलेंच्या विधानावर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाष्य केलं आहे. ‘सरन्यायाधीश गोगावले’, ‘गोगावले सत्यवादी’ अशी विशेषणं लावत शिवसेनेनं भरत गोगावलेंवर टीकेचे बाण डागले आहेत.
“महाराष्ट्रातील बेइमान सरकारच्या भवितव्याबाबतही गेल्या अनेक महिन्यांपासून जो तारखेचा घोळ, वेळकाढू धोरण सुरू आहे त्यावर बेइमान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रकाश पाडला आहे. या फुटीर आमदाराने छातीठोकपणे सांगितले की, ‘‘आमदार अपात्रतेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात पुढची पाचेक वर्षे निकाल लागणार नाही. तारीख पे तारीखची व्यवस्था झाली आहे. पुन्हा निवडणुका होतील व आम्हीच आमदार होऊ,’’ असा जो आत्मविश्वास गोगावलेसारख्या आमदाराने व्यक्त केला त्यामुळे न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह लावले गेले”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“सत्य आणि न्याय घटना किंवा कायद्याने मिळत नाही तर त्यासाठी खोकेबाजी करावी लागते व तीच खोकेबाजी फुटीर गटाच्या पाठीशी असलेल्या महाशक्तीने केल्याचे शब्दस्फोट गोगावले नामक आमदाराने केले. हे महाशय पुढे म्हणतात, ‘‘काही झाले तरी धनुष्यबाण फुटीरांनाच मिळणार!’’ याचा तरी अर्थ दुसरा काय? सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे निवडणूक आयोगही महाशक्तीच्या खिशात असून तो आपल्याला ‘धनुष्यबाण’ मिळवून देईलच, असाच त्याचा अर्थ”, अशी भूमिका शिवसेनेनं सामना अग्रलेखातून मांडली आहे.