माझी मजा उडवताय पण तुम्ही महाराष्ट्राला मागे नेताय : कृषीमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचे उत्तर
मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली […]
ADVERTISEMENT

मुंबई : टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर गेल्यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली होती. आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारमुळे टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातला गेल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांची ‘छोटा पप्पू’ म्हणतं खिल्ली उडवली.
यावर आदित्य ठाकरे यांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, तुम्ही माझी मजा उडवताय, मला नावं ठेवताय, ठीक आहे, पण महाराष्ट्राला तुम्ही मागे नेताय, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्यूत्तर दिले. माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.
उद्योग मंत्री, कृषीमंत्र्यांचे राजीनामा घेणार का?
यावेळी बोलताना आदित्य ठाकरे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचे राजीनामे घेणार का? असा सवाल केला. ते म्हणाले, एका व्यक्तीच्या गद्दारीमुळे आणि एका व्यक्तीच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेमुळे आपल्या राज्याला फटका बसत आहे. शिंदे सरकार फक्त राजकारण करत आहे. कोणताही मंत्री बांधावर फिरकलेला नाही. शेतकऱ्यांना कृषीमंत्री कोण हे देखील माहिती नाही. कृषीमंत्र्यांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत वेगळ्या कार्यक्रमासाठी बसायचे असते. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अशा परिस्थितीत कृषीमंत्री राजीनामा देणार का? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचा राजीनामा मागणार का? असा सवाल त्यांनी केला.
एका बाजूला शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होत असताना उद्योगांसाठीही महाराष्ट्र सुरक्षित नाही. आज चौथा मोठा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना अनेक प्रकल्प राज्यासाठी आम्ही आणले होते. मात्र, आता हे घटनाबाह्य सरकार आल्यावर या डबल इंजिन सरकारमधील एक इंजिन फेल झाले आहे. त्यामुळे या राज्यात येणारी गुंतवणूक आता राज्याबाहेर जात आहे. त्यामुळे आता राज्यातील एवढे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानंतर तुम्ही उद्योगमंत्र्यांचा राजीनामा घेणार का, असा सवालही त्यांनी सरकारला केला.