'आता तुम्ही म्हातारे झाले, तरी मुंबईत...', CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर जहरी टीका
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत ठाकरे बंधूंवर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले.
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीला आता अवघे 6 दिवस राहिले आहेत. अशावेळी मुंबईतील चेंबरूच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर जहरी शब्दात टीका केली आहे. 'ते सांगतात की, ते मुंबईत जन्मले त्यामुळे त्यांना मुंबईची माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले आता म्हातारे झाले.. तरी मुंबईत काय केलं ते दाखवा ना..' असं म्हणत फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी संजय राऊतांना दिलेल्या संयुक्त मुलाखतीत सध्याचे राज्यकर्ते हे मुंबईतील नसल्याने त्यांना मुंबईच्या समस्या ठाऊक नाहीत अशी टीका केली होती. ज्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं उत्तर दिलं आहे.
'आता मी एक सवाल विचारतो.. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का?, मुंबईची नाडी कोणाला माहिती होती का? त्यांचा जन्म पुण्याला झाला होता, त्यांचा जन्मही मुंबईला झाला नव्हता. आणि जे स्वत:ला सांगतात की, आम्ही मुंबईत जन्मलो त्यामुळे आम्हाला मुंबई माहिती आहे. आता जन्मून तुम्ही जवान झाले आता म्हातारे झाले.. तरी मुंबईत काय केलं ते दाखवा ना..' अशी जहरी टीका फडणवीसांनी यावेळी केली.
पाहा फडणवीस नेमकं काय म्हणाले...
'मी प्रकट मुलाखती केल्या, लोकांमध्ये जाऊन मुलाखती केल्या. पण आता नुकतंच एक दिवसापूर्वी काही मुलाखती पाहायला मिळाल्या. हा जो टीव्हीवरचा इंटरव्ह्यू होता. घरच्या माणसाचा घरच्यांनीच केलेला इंटरव्ह्यू होता. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बसले होते. दुसरीकडे संपादक साहेब त्यांचा इंटरव्ह्यू घेत होते. त्यांनी प्रश्न विचारायचे यांनी उत्तर द्यायचं. हा जो घरच्या घरी चाललेला इंटरव्ह्यू होता. आपल्याला माहिती असेल मी पहिल्या सभेत सांगितलं होतं की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती कन्फ्यूजन आणि करप्शन याची युती आहे.'










