“ठाण्यातून लढणार अन् जिंकूनही येणार!” शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंनी दिलं आव्हान
ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्ह काढण्यात आलेल्या जनप्रक्षोप मोर्चात आदित्य ठाकरेंचे भाषण, काय म्हणाले?
ADVERTISEMENT

Aditya Thackeray News :
ठाणे : स्वतःच्या शहरामध्ये, जो स्वतःचा बालेकिल्ला मानायचे, ते आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं, चॅलेंज द्या, मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार, असं जाहीर आव्हान शिवसेना (UBT) चे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं. ते आज आज ठाण्यात रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्ह काढण्यात आलेल्या जनप्रक्षोप मोर्चात बोलत होते. (A march led by Shivsena (UBT) Leader Aditya Thackeray in Thane protesting the attack on Roshni Shinde)
पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले :
ठाकरे म्हणाले, आमच्या मोर्चासाठी राज्य सरकारकडून 17 अटी घालण्यात आलेल्या आहेत. आता महाराष्ट्रात मोर्चा काढायचा नाही, भाषण करायचे नाही? लोकशाही आहे की संपली? ज्यासाठी मोर्चा घेतला तर त्यांच्याविरोधात बोलायचं नाही का? त्यांचं कौतुक करायचं का? गद्दार लोकांच्या टोळीने रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्याविरोधात तक्रार करण्यासाठी आधी आमचे नेते पोलीस आयुक्तांकडे गेले, तरीही तक्रार घेतली नाही, चिडून उद्धव ठाकरे गेले. पण पोलीस आयुक्त कार्यालयाला टाळे लावून पळाले. मी आता मोठं टाळं घेऊन आलो आहे, पोलीस आयुक्तालयाला घालणार आहोत.
हेही वाचा : विरोधी पक्षांना ‘सर्वोच्च’ दणका; ED-CBI ची ताकद आणखी वाढणार?
सरकारला मदत करणाऱ्या IAS, IPS अधिकाऱ्यांना तुरुंगात टाकणार :
तुम्हाला आज सांगतो मी, हे गद्दारांचे सरकार काही वर्षांचे, काही महिन्यांचे नाही तर काही तासांचे आहे. हे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही. कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाही, पण या सरकारला जे कोणी आयएएस, आयपीएस अधिकारी मदत करत असतील, सरकारचे चिलटे म्हणून काम करत असतील त्यांची चौकशी करणार आणि त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. हाच निश्चय करण्यासाठी आज धर्मवीर आनंद दिघे यांच्या शक्तिस्थळावर आलो आहे, असा निर्धार ठाकरेंनी बोलून दाखविला.