Vishnu Deo Sai : अमित शाहांनी वचन पाळलं, साय यांच्याबद्दल काय केलं होतं विधान?
amit shah vishnu deo sai : छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदी विष्णू देव साय यांची निवड करण्यात आली. त्यांच्याबद्दल अमित शाह यांनी निवडणुकीपूर्वीच एक मोठं विधान केले होते.
ADVERTISEMENT

Amit Shah Vishnu Deo Sai : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण बसणार? यावरून सुरू असलेली कोंडी रविवारी फुटली. भाजपने मुख्यमंत्रीपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावांवर शिक्कामोर्तब केले. रविवारी (10 डिसेंबर) झालेल्या 54 नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड करण्यात आली. साय यांच्या निवडीनंतर अमित शाह यांचं एक विधान चर्चेत आले.
मुख्यमंत्रिपदासाठी विष्णू देव साय यांच्या नावाला मंजुरी दिल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. खरे तर त्यांनी गेल्या महिन्यात कुणकुरी विधानसभा मतदारसंघात विष्णु देव साय यांच्या प्रचारार्थ रॅली काढली होती.
या रॅलीत अमित शाह यांनी मतदारांना विष्णू देव साय यांना आमदार करण्याचे आवाहन केले होते. राज्यात पुन्हा पक्षाची सत्ता आल्यास साय यांना ‘मोठा माणूस’ बनवू, असे वचन शाह यांनी दिले होते.
अमित शाह यांनी विष्णू देव साय यांच्याबद्दल काय केले होते विधान?
“विष्णू देव साय हे आमच्या पक्षाचे अनुभवी नेते आहेत”, असे अमित शाह सभेत म्हणाले होते. “त्यांनी खासदार, आमदार आणि प्रदेशाध्यक्षपदही भूषवले आहे. आता तुम्ही त्यांना आमदार करा. साय यांना ‘मोठा माणूस’ बनवण्यासाठी आम्ही काम करू”, असे विधान शाह यांनी केले होते.










