भरत गोगावलेंचं पालकमंत्रीपद जाणार? आदिती तटकरेंचा वाद अन् अर्थ काय?
एकनाथ शिंदेंचे आमदार भरत गोगावल यांनी आदिती तटकरे यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधान केले. त्यांना उत्तर देताना अमोल मिटकरींनी गर्भित इशारा दिला आहे.
ADVERTISEMENT

Bharat Gogawale : एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झालं, तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. भरत गोगावले तर सरकार आल्यापासूनच आपण मंत्री, रायगडचा पालकमंत्री होणार असं मोठ्या विश्वासाने सांगत आहेत. मात्र मागून येऊन रायगडच्या आदिती तटकरे कॅबिनेट मंत्री झाल्या. तटकरेंच्या एंट्रीनंतर गोगावले अचानक आक्रमक झालेत. त्याचवेळी आता गोगावलेंचं रायगडचा पालकमंत्री होण्याचं स्वप्नही संपल्यात जमा झाल्याचं म्हटलं जातंय. गेल्या चोवीस तासात असं काय घडलं की गोगावले अडचणीत आले आणि अमोल मिटकरींनी रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गोगावलेंना काय सुनावलं? याचीच आता चर्चा सुरूये.
अजित पवारांनी 8 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली. पण 12 दिवस झाले, तरी खातेवाटप झालं नाही. दुसरीकडे मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार करण्याची चर्चा सुरू झालीये. विस्तारानंतरच सर्वांचं एकत्रित खातेवाटप होईल, असंही सांगितलं जातंय. पण या सगळ्यांमध्ये मंत्री कोण होणार, यापेक्षा काही जिल्ह्यांत पालकमंत्री कोण होणार यावरून राजकारण रंगलंय.
भरत गोगावलेंची कोंडी
तीनवेळा आमदार झालेले भरत गोगावले आपलं मंत्रिपद फिक्स असल्याचं सांगत आहेत. एवढंच नाही, तर शिंदे गटाचे विधानसभेतील प्रतोद असलेल्या गोगावलेंनी रायगडच्या पालकमंत्रिपदावरही दावा ठोकलाय. पण पवारांच्या सरकारमधील एंट्रीनं गोगावलेंची मोठी कोंडी झालीये.
वाचा >> Maharashtra Cabinet Expansion : अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!
अजित पवारांसोबत पहिल्यांदाच आमदार झालेल्या रायगडमधील आदिती तटकरेंनी थेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या दादा गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या कन्या आहेत. दादांच्या बंडाचे तटकरेंही एक शिल्पकार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळेच रायगडमध्ये सहापैकी केवळ एक आमदार राष्ट्रवादीचा असला तरी पालकमंत्रिपद खासदार तटकरेंच्या मुलीचीच दावेदारी प्रबळ असल्याचं म्हटलं जातंय. दुसरीकडे रायगडमध्ये शिवसेनेकडे सहापैकी तीन आमदार आहेत.










