उद्धव ठाकरेंना भाजप पुन्हा एंट्री देणार? अमित शाहांनी विषय केला क्लिअर
उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा हातमिळवणी करणार का, शिंदेंना सोबत घेऊनही मतांची गोळीबेरीज जमत नसल्याने भाजप नव्या जुळवाजुळवीच्या तयारीत आहे? अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ADVERTISEMENT

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे-फडणवीसांची विधान भवनाच्या दारातच भेट झाली. ही भेट म्हणजे योगायोग की घडवून आणलेला योग, अशा चर्चा सुरू झाल्या. यातून उद्धव ठाकरे आणि भाजप पुन्हा हातमिळवणी करणार का, शिंदेंना सोबत घेऊनही मतांची गोळीबेरीज जमत नसल्याने भाजप नव्या जुळवाजुळवीच्या तयारीत आहे, अशा चर्चांना उधाण आलं. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपचे निवडणूक चाणक्य अमित शाहांचं विधान समोर आलंय. अमित शाह नितीश कुमारांबद्दल बोलताना ठाकरेंसाठी काय मेसेज दिला आणि त्याचा अर्थ काय हेच आपण जाणून घेऊयात.
महाराष्ट्रात भाजपच्या ऑपरेशन लोटसने उद्धव ठाकरेंना पायउतार व्हावं लागलं. आणि भाजप-शिंदेंचं सरकार आलं. त्याचवेळी तिकडे बिहारमध्ये भाजपला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. नितीशकुमारांनी भाजपची साथ सोडत आरजेडी, काँग्रेससोबत हातमिळवणी करत नवं सरकार बनवलं. त्याच बिहारच्या नवादात केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची जाहीर सभा झाली. सुरवातीलाच भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना शाह नेमकं काय म्हणाले ते बघुयात.
अमित शाह बिहारमध्ये नेमके काय म्हणाले?
अमित शाह म्हणाले, “मित्रपक्षांचे आमदार दररोज नितीश बाबूंचा विरोध करत आहेत. तेही जनतेच्या विरोधाचा सामना करत आहेत. त्यांचे निम्मे खासदार भाजपचे दरवाजे ठोठावत आहेत. मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो, कुणाच्याही मनात अशी शंका असेल की, निवडणुकीनंतर नितीश बाबूंना भाजप पुन्हा एनडीएमध्ये घेईल. मी बिहारच्या जनतेला स्पष्ट सांगू इच्छितो आणि लल्लन बाबूंनाही स्पष्ट सांगू इच्छितो की, तुमच्यासाठी भाजपचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत.”
हेही वाचा – अमित शाह, तुम्ही संगमा, मिंध्येचं काय चाटताय? उद्धव ठाकरेंचा खडा सवाल
“जनतेलाही हेच हवंय की नितीश बाबूंना पुन्हा सोबत घेऊ नये. असंच होईल. जातीवादाचे विष घुसळवणारे नितीश बाबू आणि जंगलराजचे प्रणेते लालू प्रसाद यादव, या दोघांसोबत भाजप कधीही राजकीय संबंध ठेवणार नाही”, असं विधान शाह यांनी केले.










