मोदींच्या पदवी वादात अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीनेही हात झटकले!
नरेंद्र मोदींच्या पदवी वादावर महाविकास आघाडीतच वेगवेगळे सूर आहेत. अजित पवारांनी मांडलेल्या भूमिकेपासून राष्ट्रवादी काँग्रेसने अंतर ठेवलं आहे.
ADVERTISEMENT

छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांच्या उपस्थितीतच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर डिग्रीवरून हल्लाबोल केला. पण दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी मोदींच्या डिग्रीबद्दल वेगळी भूमिका मांडली. अजित पवारांनी अवघ्या 24 तासांतच उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवरच बोट ठेवलं. त्यावरून मविआत एकमत नसल्याचं चव्हाट्यावर आलं. पण आता राष्ट्रवादीनेही ठाकरेंच्या भूमिकेची री ओढलीय. कोण काय म्हणालं आणि अजित पवारांच्या भूमिकेपेक्षा राष्ट्रवादीनं कोणती वेगळी भूमिका घेतली, हेच बघुयात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून देशभर वाद सुरू आहे. मोदींची डिग्री दाखवा म्हणून अरविंद केजरीवाल आक्रमक झाले. पण, गुजरातमधील न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 25 हजाराचा दंड ठोठावला. याबद्दलच छत्रपती संभाजीनगरच्या सभेत उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं होतं.
वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले, ते बघा…
उद्धव ठाकरे म्हणाले होते, “देशात लाखो युवक सुशिक्षित आहेत. पदवीधर आहेत. अनेकांची घरची परिस्थिती शिक्षण पूर्ण करण्यासारखी नाही. कर्ज काढून शिक्षण घेतलं. पदवी मिळवलेली आहे. कारण हल्ली असं म्हणतात की, डॉक्टरेट सुद्धा विकत घेता येते. मला कुणाचा संदर्भ द्यायचं नाही. काहीजण पाण्याचं इंजेक्शन घेऊन फिरतात, सोडून द्या त्यांना.”
“अनेक पदवीधर असे आहेत की, पदव्या दाखवूनही त्यांना किंमत मिळत नाहीये. एकाबाजूला देशाची अशी स्थिती आहे की, पदवी दाखवून सुद्धा किंमत मिळत नाही आणि दुसऱ्या बाजूला पंतप्रधानांची पदवी दाखवायला मागितली, तर 25 हजारांचा दंड होतो. अशी कोणती पदवी आहे त्यांच्याकडे? कोणत्या कॉलेजची आहे? कॉलेजला सुद्धा अभिमान वाटायला पाहिजे की, कॉलेजमध्ये शिकलेला विद्यार्थी देशाच्या पंतप्रधानपदी बसला आहे. हा अभिमान त्या कॉलेजला असला पाहिजे”, असं ठाकरे यावेळी म्हणाले.