Caste Census : ‘हिंदूंनी त्यांचे हक्क घ्यावेत का?’, जात जनगणनेवर PM मोदींचं मोठं विधान
Caste Census : जातनिहाय जनगणनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसने अल्पसंख्याकांना गरीब ठेवले, असा आरोप मोदींनी केला.
ADVERTISEMENT

PM Modi on Caste Census : छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच प्रचाराला वेग आला आहे. मंगळवारी बस्तरच्या जगदलपूरमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील काँग्रेस सरकारवर जोरदार निशाणा साधला. बिहारच्या जात जनगणनेबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या घोषणाबाजीवरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. पीएम मोदी म्हणाले, काँग्रेसने वेगळा राग आळवण्यास सुरूवात केली आहे. हे म्हणताहेत की, ‘जितनी आबादी, उतना हक’ (जेवढी लोकसंख्या जास्त, तेवढे अधिकार जास्त). मी म्हणतो की, ‘या देशात जर सर्वात जास्त लोकसंख्या कुणाची असेल, तर ती गरिबांची आहे. त्यामुळे गरिबांचे कल्याण हेच माझे ध्येय आहे.’ (The PM said that Congress wants to divide the country by dividing Hindus)
पंतप्रधान म्हणाले की, “काँग्रेस लोकसंख्येनुसार वाटा बोलते. काँग्रेसला हिंदूंमध्ये फूट पाडून देशाचे तुकडे करायचे आहेत. माझ्यासाठी सर्वात मोठी जात ही गरीब आहे आणि माझे सरकार गरिबांच्या कल्याणात गुंतले आहे. गरीब दलित असो वा मागास, गरिबांचं भलं झाले, तर देशाचे भलं होईल.”
काँग्रेसला अल्पसंख्याकांचे हक्क कमी करायचेत का?
मोदी म्हणाले, “माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय विचार करत असतील, असा मला प्रश्न पडला होता. देशाच्या साधनसंपत्तीवर अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे, असे ते म्हणायचे. त्यातही मुस्लिमांचा. पण, आता काँग्रेस म्हणत आहे की, देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार कोणाचा असेल हे लोकसंख्या ठरवेल? मग आता त्यांना (काँग्रेस) अल्पसंख्याकांचे हक्क कमी करायचे आहेत का?”, असा सवाल मोदींनी केला.
हेही वाचा >> मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच भाजपने ‘ओबीसी जागर यात्रा’ का काढली?
“लोकसंख्येनुसार होणार असेल, तर पहिला अधिकार कोणाचा असावा? काँग्रेसवाल्यांनी खुलासा करावा. काँग्रेसला अल्पसंख्याकांना हटवायचे आहे का? त्यामुळे सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या हिंदूंनी पुढे येऊन त्यांचे सर्व हक्क घ्यावेत? मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की काँग्रेस पक्ष आता काँग्रेसवाले चालवत नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तोंडाला कुलूप लावून बसले आहेत. हे सगळं बघून ना त्यांना विचारलं जातं, ना बोलायची हिंमत. आता काँग्रेस आऊटसोर्स झाली आहे. काँग्रेस आता अशा लोकांकडून चालवली जात आहे, लोक पडद्यामागे असे चमत्कार करत आहेत, ज्यांची देशविरोधी शक्तींशी मिलीभगत आहे”, असा हल्ला मोदींनी काँग्रेसवर जातगणनेवरून चढवला.