2000 Note Ban : “विरोधकांना अडचणीत आणण्याचा हेतू”, मोदींवर ठाकरेंचे पुन्हा ‘बाण’
आरबीआयकडून याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधक मोदी सरकारवर या निर्णयाचं खापर फोडताना दिसत आहे. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत.
ADVERTISEMENT
2000 Note Ban : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 ची नोट व्यवहारातून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयकडून याची घोषणा करण्यात आल्यानंतर विरोधक मोदी सरकारवर या निर्णयाचं खापर फोडताना दिसत आहे. ठाकरे गटाने सामना अग्रलेखातून मोदींवर पुन्हा एकदा टीकेचे बाण डागले आहेत. “देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्डय़ात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय”, असं म्हणत ठाकरे गटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत. (Shiv Sena UBT hits out at narendra modi over 2000 Note withdrawn from circulation)
ADVERTISEMENT
2000 ची नोट परत घेण्याच्या निर्णयावर भाष्य करताना सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “भारतीय अर्थव्यवस्थेचा जो खेळखंडोबा सुरू आहे, त्यास इतिहासात तोड नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून तडकाफडकी बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या नोटाबंदीचा खटका पंतप्रधान मोदी यांनी स्वतः वृत्तवाहिन्यांवर येऊन दाबला. पाचशे आणि एक हजारच्या नोटा त्यांनी चलनातून बाद केल्या व एकच हाहाकार उडाला. मोदी रात्री आठ वाजता टीव्हीवर प्रकट झाले व दुसऱ्या दिवसापासून त्यांनी संपूर्ण देशाला ‘नोटा’ बदलण्यासाठी बँकांच्या रांगेत उभे केले. त्या रांगेत देशभरात चार हजारांवर माणसे मरण पावली व नोटाबंदीचा काडीचाही फायदा झाला नाही.”
हेही वाचा >> Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी
पंतप्रधान मोदी यांनी नोटबंदीची घोषणा करताना त्यामागील उद्देश सांगितले होते. त्यावरही ठाकरे गटाने बोट ठेवलं आहे. “लहान उद्योग, छोटे व्यापारी देशोधडीस लागले. नोकऱ्या गेल्या. काळा पैसा बाहेर येईल, असे मोदी म्हणाले. उलट काळा पैसा जास्तच वाढला. दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा नोटाबंदीमुळे थांबेल असा त्यांचा दावा होता. प्रत्यक्षात उलटेच झाले. मोदींनी हजाराची नोट चलनातून बाद केली व दोन हजारांची गुलाबी नोट आणली. त्यामुळे हजार-पाचशेत होणारी लाचखोरी दोन हजारांच्या नोटेत पोहोचली, हेच नोटाबंदीचे फायदे. आता मोदींनी ‘लहर’ आली म्हणून दोन हजारांची नोटही बाद केली. हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने जाहीर केला.”
हे वाचलं का?
विरोधकांना अडचणीत आणण्याचा हेतू
“आपल्या देशातील न्यायालये, घटनात्मक संस्था, निवडणूक आयोग जेथे स्वतंत्र आणि निष्पक्ष राहिले नाहीत, तेथे ‘भारताची रिझर्व्ह बँक’दोन हजारांच्या नोटांबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकेल काय? दोन हजारांच्या नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे राजकीय आहे. पहिल्या नोटाबंदीच्या वेळी ज्या उदात्त भावनेने नोटाबंदी लादली, तोच प्रकार आता आहे. विरोधी पक्षांकडे 2024 च्या दृष्टीने थोडेबहुत दोन हजारांच्या नोटांचे चलन राखून ठेवले असेल तर ते बाद व्हावे व विरोधी पक्ष त्यादृष्टीने अडचणीत यावा यापेक्षा दुसरा हेतू असू शकत नाही”, असा गंभीर आरोप ठाकरे गटाने या निर्णायावरून मोदी सरकारवर केला आहे.
हेही वाचा >> Shiv Sena: राणे-सामंतांनी सुषमा अंधारेंना डिवचलं, पण ठाकरे गटाने…
“कर्नाटकच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून दोन हजारांच्या गुलाबी नोटांचा अफाट वापर झाला, पण दोन हजारांची मात्रा चालली नाही. त्या चिडीतूनही ‘दोन हजारांची नोट बाद’ असा निर्णय झालेला असू शकतो. दोन हजारांची नोटाबंदी ही लोकसभा निवडणुकांची पहिली घंटा आहे. देशाच्या चलनात दोन हजारांच्या नोटा किती आहेत व लोकांनी त्यातील किती दडवून ठेवल्या आहेत? हे एक रहस्य आहे”, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
मोदी भक्त… अग्रलेखात काय म्हटलंय?
दोन हजाराची नोट व्यवहारातून काढून घेण्याच्या निर्णयाला मोदी समर्थकांकडून पाठिंबा मिळताना दिसत असून, याबद्दल अग्रलेखातून टोला लगावण्यात आला आहे. “मोदी यांचे अंध भक्त म्हणजे एक अजबच रसायन म्हणावे लागेल. एक हजाराची नोट बाद करून दोन हजारांची नोट चालू करणे हा एक मास्टर स्ट्रोक होता व आता दोन हजारांची नोट अचानक बंद करणे हासुद्धा अंध भक्तांसाठी मोदींचा मास्टर स्ट्रोकच आहे. असे ढोंग व दुटप्पीपणा फक्त हे अंध भक्तच करू शकतात”, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
“दोन हजारांची नोट चालू करून मोदी हे दहशतवादाची कंबर तोडणार होते व आता तीच दोन हजारांची नोट बंद करून मोदी देशाच्या अर्थव्यवस्थेची कंबर तोडत आहेत. कारण मणिपूरपासून जम्मू-कश्मीरपर्यंत दहशतवादाची कंबर अजिबात तुटलेली नाही. हिंसाचार व दहशतवाद सुरूच आहे. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे खड्ड्यात घालण्याचा चंगच मोदी यांनी बांधलेला दिसतोय”, असं टीकास्त्र मोदींवर डागण्यात आलं आहे.
50 खोकेवाल्यांचा दुःखात सहभागी, ठाकरे गटाने कुणाला डिवचलं?
“डॉलरच्या तुलनेत रुपया नीचांक पातळीवर कोसळला आहे. 85 रुपये एका डॉलरला ही स्थिती आहे. 10 वर्षांपूर्वी मनमोहन सिंग पंतप्रधान असताना डॉलरची किंमत 45 रुपये होती, आज 85 रुपये झाली. ही आपली आर्थिक महासत्ता! मोदी अर्थव्यवस्थेशी निर्घृणपणे खेळत आहेत, हे गौतम अदानी प्रकरणातही दिसले. देशातील सर्व सार्वजनिक उपक्रम मोदींनी अदानी यांच्या खिशात टाकले. विमानतळांपासून बंदरांपर्यंत सर्व राष्ट्रीय संपत्ती आज गौतम अदानींची झाली. सार्वजनिक बँकांचा, एलआयसीसारख्या उपक्रमांचा पैसाही त्यांनी अदानींसारख्या मित्रांना दिला. आपण राष्ट्रीय संपत्तीचे मालक नसून विश्वस्त आहोत याचा विसर त्यांना पडला आहे”, असा टोला ठाकरे गटाने मोदींना लगावला आहे.
Video >> आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंना ललकारलं, BMC Election आधी दिलं चॅलेंज
“पंतप्रधानांची आज सामान्य जनतेत प्रतिष्ठा राहिलेली नाही. सर्व राष्ट्रीय कामे बाजूला ठेवून पंतप्रधान कर्नाटकच्या निवडणुका, सभा व रोड शो घेतात व शेवटी त्यांचा पराभव होतो. त्या पराभवाची चर्चा कमी करण्यासाठी एका रात्रीत दोन हजारांची नोटाबंदी जाहीर केली जाते, पण त्यांच्या निर्णयाने यावेळी ना खळबळ माजली, ना सळसळ झाली. 50 खोकेवाल्यांच्या दुःखात मात्र सहभागी व्हावे लागेल. त्यांना खोक्यात गुलाबी धनच मिळाले असेल. त्यांची धावपळ समजून घ्यावी लागेल इतकेच”, असं भाष्य सामना अग्रलेखातून ठाकरे गटाने केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT