भावी मुख्यमंत्री ‘अजित पवार’ : महाराष्ट्रात लागलेल्या होर्डिंग्जचा अर्थ काय?
राष्ट्रवादी समर्थकांनी अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिवपाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत.
ADVERTISEMENT

महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. एका बाजूला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार (Sharad Pawar) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) भवितव्याबाबत अनिश्चितता व्यक्त करत आहेत. शिवसेना (UBT) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडांच्या चर्चांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर त्याचवेळी राष्ट्रवादीतही याच कारणामुळे अजित पवार एकाकी पडलेले दिसत आहेत. पण दुसरीकडे त्यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री म्हणूनही उल्लेख केला जात आहे. (With the help of posters ncp supporters have started projecting Ajit Pawar as the future Chief Minister)
नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी समर्थकांनी अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिवपाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत. मुंबईत लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागात अजित पवार यांचे अशा प्रकारचे होर्डिंग्ज दिसत आहेत.
अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याबरोबरच खारघर दुर्घटनेचाही उल्लेख या होर्डिंग्जवर करण्यात आला आहे. या होर्डिंग्जवर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर खारघरमधील दुर्घटनेबाबत तातडीने कारवाई केली असती, असे म्हटले आहे.
केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागातही अजित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धाराशिव आणि मुंबई व्यतिरिक्त नागपूरच्या धरमपेठ परिसरात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशांत पवार यांनी अजित पवार यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले आहे.