Ajit Pawar: अजितदादा पुन्हा नाराज?, शरद पवारांच्या ऐतिहासिक घोषणेवेळी होते गैरहजर
शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याचा निर्णय अखेर मागे घेतला आहे. मात्र, शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत अजित पवार गैरहजर असल्याने ते नाराज असल्याची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाच्या अध्यक्ष पदाची घोषणा करून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संपूर्ण पक्षात बराच गदारोळ झाला. अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या भावना अतिशय तीव्रपणे व्यक्त केल्या. अखेर तीन दिवस चाललेल्या या राजकीय नाट्यावर स्वत: शरद पवार यांनीच आपला निर्णय मागे घेत पडदा टाकला. पण गेल्या तीन दिवसाच्या सगळ्या घडामोडींनंतर स्वत: शरद पवार आज (5 मे) पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा करत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) हे मात्र पत्रकार परिषदेला गैरहजर होते. ज्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. (ajit pawar upset again why was he absent during sharad pawars historic announcement)
शरद पवार राजीनामा देणार म्हणताच कार्यकर्ते हे अत्यंत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर नेते आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपण अध्यक्षपदी कायम राहणार आहोत असं शरद पवार यांनी जाहीर केलं. पण या महत्त्वाच्या घोषणेवेळी अजित पवार हे का गैरहजर होते? असा सवाल अनेक जण विचारत आहे. तसेच अनेकांच्या मते अजित पवार हे पुन्हा एकदा नाराज तर झाले नाही ना?
2 मे रोजी शरद पवार यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्या सभागृहातील प्रत्येक नेत्याने आणि कार्यकर्त्याने शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी अक्षरश: टाहो फोडला होता. असं असताना फक्त एकमेव अजित पवार हे असे नेते होते की, जे म्हणत होते की, शरद पवार हे आपला निर्णय मागे घेणार नाहीत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते दुसरा अध्यक्ष तयार करतील. त्यामुळे आपण त्यांच्या या निर्णयाला साथ दिली पाहिजे.
हे ही वाचा >> ‘अजित पवार आता गप्प बसा’,राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया
एकीकडे अजित पवार हे असं म्हणत असताना दुसरीकडे सर्वच नेत्यांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा असं मागणं लावून धरलं होतं. अखेर आज शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. ज्याबाबत त्यांनी अजित पवारांना देखील कल्पना दिली होती. पण असं असून देखील अजित पवार हे काही पत्रकार परिषदेला गैरहजर राहिले. ज्यामुळे आता उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे.










