CM फडणवीसांना सलग दुसऱ्या दिवशी माणिकराव कोकाटेंवर लागलं बोलावं, मंत्रिपद धोक्यात?
‘शासन भिकारी आहे...’असं वादग्रस्त विधान करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया द्यावी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे कृषी मंत्र्यांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
माणिकराव कोकाटे यांच्या ‘शासन भिकारी आहे’ विधानावरून वाद
‘शासन भिकारी आहे...’, सलग दुसऱ्या दिवशी कोकाटेंनी ओढावून घेतला वाद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली नाराजी
नाशिक: महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज (22 जुलै) पत्रकार परिषदेत केलेल्या “शासन भिकारी आहे, शेतकरी नाही” या विधानामुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झाला आहे. हे विधान त्यांनी पीकविमा योजनेच्या संदर्भात केले होते, ज्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर तीव्र टीका केली आहे. पण आता सलग दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माणिकराव कोकाटेंच्या विधानाची दखल घेत त्यांना इशारा दिला आहे.
सुरुवातीला विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर काल (21 जुलै) मुख्यमंत्री फडणवीसांनी 'हे भूषणावह नाही...' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंविरोधात नाराजी व्यक्त केली होती. तर आता सलग दुसऱ्यादिवशी कोकाटेंनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने मुख्यमंत्री फडणवीस नाराज झाले आहेत. पण यामुळे कोकाटेंच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
'शासन भिकारी आहे, शेतकरी भिकारी नाही..', माणिकराव कोकाटे काय बोलून गेले?
एकीकडे विधानसभेत रमी खेळतानाचा वाद ताजा असताना माणिकराव कोकाटे यांनी दुसरा वाद ओढावून घेतला आहे. आजच्या पत्रकार परिषदेत पीकविमा योजनेवर बोलताना ते म्हणाले की, “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. म्हणजे भिकारी कोण आहे? शासन आहे, शेतकरी नाही.”
हे ही वाचा>> 'सभागृहात रमी खेळणं हे काही...', CM फडणवीसांचं 'हे' विधान माणिकराव कोकाटेंसाठी धोक्याचा इशारा?
दरम्यान, त्यांच्या याच विधानावर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि इतर विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. विशेषतः, “शासन भिकारी आहे” या शब्दप्रयोगाला असंवेदनशील आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारं विधान असं म्हटलं आहे.










