अजित पवारांकडे अर्थ खातं पण प्रत्येक फाईल जाणार फडणवीसांकडे?, नेमकं राजकारण काय?
अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते गेल्याने भाजप-शिवसेनेच्या आमदारांची चिंता वाढली आहे. मात्र, यावर आता एक नवा पर्याय शोधण्यात आला आहे. जाणून घ्या नेमकं सरकारमध्ये काय सुरू आहे.
ADVERTISEMENT
मुंबई: ‘मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत जाणं गरजेचं आहे..’ असं सांगत अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) बंड करत थेट भाजपसोबत (BJP) सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे अजित पवार हे विरोधीपक्ष नेत्यावरुन पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर अजित पवारांसोबत गेलेल्या 9 आमदारांनाही मंत्री करण्यात आलं. नुकताच या नव्या मंत्र्यांना खात्यांचे देखील वाटप करण्यात आलं आहे. अजित पवार पुन्हा एकदा अर्थ खातं (Finance Ministry) देण्यात आलं आहे. त्यामुळे अजित पवार निधी देत नाही असं म्हणत ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची आता मोठी पंचायत झाली. अजित पवारांना अर्थ खातं देऊ नये अशी शिंदेंच्या आमदारांची मागणी होती. त्याचबरोबर भाजपच्या काही आमदारांचं देखील असंच मत होतं. पण आता या सगळ्यावर एक वेगळाच मार्ग काढण्यात आला आहे. (dcm ajit pawar finance minister shiv sena bjp mla worried dcm devendra fadnavis bjp files latest news maharashtra politics)
ADVERTISEMENT
अजित पवारांना हे मान्य होईल?
वित्त विभागाच्या फाईल्स अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्र्यांकडे मान्यतेसाठी जाणार नाहीत. त्या आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दाखवण्यात येतील असं ठरवण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. या वृत्तानुसार, अजित पवारांना वित्त खातं देताना झालेल्या वाटाघाटीनुसार अजित पवारांकडून वित्त विभागाच्या ज्या फाईल्स शिंदेंकडे जातील त्या सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून जातील.
अजित पवार निधी देताना राष्ट्रवादीच्या आमदारांना बळ देतील अशी भीती शिंदे आणि भाजपच्या आमदारांनी बोलून दाखवली होती. त्यामुळे अजितदादांना वित्त खातं देऊ नये अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यामुळे यातून मार्ग काढण्यासाठी हा फॉर्म्युला ठरवण्यात आल्याचं बोललं जातं आहे.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> ‘ही सगळी बंडलबाजी’; अशोक चव्हाणांचा एकनाथ शिंदे-अजित पवारांना ‘डोस’
दरम्यान, आता जो पर्याय शोधण्यात आला आहे तो अजित पवार यांना मान्य होईल का? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. अजित पवार म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व अशी ओळख अवघ्या महाराष्ट्राला आहे. अशावेळी आता बाणेदार अजित पवारांना त्यांच्याकडील फाईल्स देवेंद्र फडणवीसांकडे जाणं मान्य होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा >> ‘तेव्हा दुतोंडी साप जहर का ओकत होते?’, फडणवीसांना शिवसेनेचा (UBT) सवाल
‘अजित पवारांची प्रत्येक फाईल देवेंद्र फडणवीसांच्या नजरेखालून जाईल’
याला आता शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, ‘आता सत्तेत तीन वाटेकरू झाले आहेत. अजित पवार हे मातब्बर नेते असल्यामुळे त्यांना सन्मानाचं खातं देणं गरजेचं होतं’, असं मत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी व्यक्त केलं आहे. ‘अर्थ खातं जरी अजित पवारांकडे असलं तरी आता मागच्या काळासारखं होणार नाही. अर्थ खात्याकडे येणारी प्रत्येक फाईल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नजरेखालून जाणार आहे. त्यामुळे मागच्या काळात जे असंतुलित काम झालं होतं, ते या काळात होणार नाही. त्यामुळे मागच्या काळात जे गैरसमज झाले होते, ते कामाच्या रूपाने बाहेर येतील.’ हा निर्णय योग्य असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवारांकडे अर्थ खाते देण्यात आल्याचं समर्थनही केलं आहे.
ADVERTISEMENT
त्यामुळे या नव्या फॉर्म्युल्यामुळे शिंदे आणि भाजपच्या आमदारांच्या तक्रारी थांबणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT