“… त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार
फडणवीसांना फडतूस, लाळघोटे म्हणत केलेल्या ठाकरेंनी लक्ष्य केलं. फडणवीसांनीही नागपुरातून ठाकरेंवर प्रहार केला. ठाकरेंची मागणी फेटाळून लावत फडणवीसांनी गृहमंत्री पद सोडणार नाही, असं म्हणत जाहीर इशारा दिला.
ADVERTISEMENT

ठाण्यात झालेल्या मारहाणीच्या प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीका केली. फडणवीसांना फडतूस, लाळघोटे म्हणत केलेल्या ठाकरेंनी लक्ष्य केलं. फडणवीसांनीही नागपुरातून ठाकरेंवर प्रहार केला. ठाकरेंची मागणी फेटाळून लावत फडणवीसांनी गृहमंत्री पद सोडणार नाही, असं म्हणत जाहीर इशारा दिला.
रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीनंतर उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीसांवर टीका करताना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली.उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अडीच वर्षाचा त्यांचा कारभार बघितल्यानंतर नेमकं फडतूस कोण आहे, हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. खरं म्हणजे माझा सवाल असा आहे की, दोन दोन मंत्री जेलमध्ये गेल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे मुख्यमंत्री त्या मंत्र्यांच्या भोवती लाळ घोटत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे?”, असा खडा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘पळता भुई थोडी होईल’, उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचा इशारा
“जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? ज्यांच्या काळात पोलीस एक्सटॉर्शन करतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय आहे? अडीच वर्ष घरी बसून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आमचं तोंड उघडलं तर त्यांना पळता भुई थोडी होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत, पण याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही, असं नाही.ज्या दिवशी बोलणं सुरू करेन, त्यादिवशी पळता भुई थोडी होईल, त्यामुळे संयमाने बोला”, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना दिला.
मी नागपूरचा, मला त्यापेक्षा खालची भाषा येते, पण…; फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सगळ्यात महत्त्वाचं असं की, त्यांचा जो थयथयाट आहे. हे जे त्यांचं नैराश्य आहे, त्याला उत्तर देण्याचे काही कारणच नाही. पहिल्यांदा तर त्यांनी हे उत्तर दिलं पाहिजे की, मोदींचे फोटो लावून निवडून येता आणि त्यानंतर विरोधकांची लाळ घोटता. फक्त खुर्ची करीता लाळ घोटेपणा करता. मग खरा फडतूस कोण, हा सवाल महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. त्यामुळे ते कुठल्याही भाषेत बोलले असले, तरी त्यांच्यापेक्षा खालची भाषा मला येते, मी नागपूरचा आहे. पण, मी तसं बोलणार नाही कारण तशी बोलण्याची माझी पद्धत नाही.”










