जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन
Satyapal Malik Passed Away: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (5 ऑगस्ट) दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी (5 ऑगस्ट) दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते बऱ्याच काळापासून मूत्रपिंडाच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना 11 मे रोजी दिल्लीच्या राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्यांनी याच रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सत्यपाल मलिक हे ऑगस्ट 2018 ते ऑक्टोबर 2019 पर्यंत जम्मू आणि काश्मीर राज्याचे शेवटचे राज्यपाल होते. त्यांच्याच कार्यकाळात 5 ऑगस्ट 2019 रोजी कलम 370 रद्द करण्यात आले होते. ज्यामुळे जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आला होता. ज्यानंतर जम्मू-काश्मीर आणि लडाख यांचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्यात आले. आज या निर्णयाचा 6 वा वर्धापन दिन आहे आणि याच दिवशी सत्यपाल मलिक यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाचा>> ‘निवडणुका जिंकण्यासाठी पुलवामा घडवलं?’, सत्यपाल मलिकांच्या खळबळजनक आरोपानंतर राऊतांचा हल्लाबोल
ते ऑक्टोबर 2017 ते ऑगस्ट 2018 पर्यंत बिहारचे राज्यपाल होते. 21 मार्च 2018 ते 28 मे 2018 पर्यंत त्यांना ओडिशाचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. जम्मू आणि काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाल्यानंतर सत्यपाल मलिक यांची गोव्याचे 18 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी ऑक्टोबर 2022 पर्यंत मेघालयाचे 21 वे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते.










