"त्याचे दोन भाऊ सैन्यात, त्याच्या मुलालाही...", शहीद जवान दिनेश शर्मांचे वडील काय म्हणाले?
Poonch Firing News : “दिनेश आणि इतर चार सैनिक नियंत्रण रेषेवर (LOC) गस्त घालत असताना उखळी तोफांच्या हल्ल्यात शहीद झाले. आम्हाला आणि संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे." असं त्यांचे वडील राम शर्मा म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पाकिस्तानकडून पुंछमध्ये उखळी तोफांचा मारा
जवान दिनेश शर्मा हल्ल्यात शहीद
कुटुंब आणि वडिलांनी सांगितल्या हिमतीच्या कहाण्या
Shahid Jawan Dinesh Sharma : पाकिस्तानवर भारताने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर बिथरलेल्या पाकिस्तानने आता सीमावर्ती भागात गोळीबार सुरू केलाय. पाकिस्तानने पुंछ भागात मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि उखळी तोफांनी हल्ला केला. यामध्ये भारतीय सैन्यातील सैनिक शहीद झाला आहे. हरियाणाच्या पालवल जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावचे 32 वर्षीय लान्स नायक दिनेश कुमार यांना वीरमरण प्राप्त झालं.
काही दिवसांपूर्वीच झाली होती लान्स नायक म्हणून बढती
दिनेश 2014 मध्ये सैन्यात भरती झाले होते. अलीकडेच त्यांची लान्स नायक म्हणून बढती झाली होती. ते जम्मू-काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात तैनात होते, अशी माहिती त्यांचे वडील दया राम शर्मा यांनी दिली. “आज सकाळी आम्हाला त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्याच्यावर उद्या (गुरुवारी) अंत्यसंस्कार केले जाणार आहेत,” असं राम शर्मा म्हणाले.
हे ही वाचा >> पाकिस्तान पुन्हा हादरला! लाहोरला तीन मोठे स्फोट, सायरन वाजला, लोक पळत सुटले, घटना काय?
ऑपरेशनसाठी जाताना केला होता शेवटचा फोन...
दिनेश शर्मा यांचा धाकटा भाऊ पुष्पेंद्र म्हणाला, दोन दिवसांपूर्वी तो माझ्याशी बोलला होता. तेव्हा त्यानं कुटुंबातल्या सर्वांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दिनेशचा जवळचा मित्र प्रदीप म्हणाला की, काल रात्री दिनेश ऑपरेशनसाठी जात असताना त्यानं रात्री 10:30 वाजता त्याच्याशी बोलून तो ऑपरेशनसाठी जात असल्याचं सांगितलं होतं. ऑपरेशनदरम्यान फोन जवळ ठेवता येणार नाही, म्हणून आपण नंतर बोलू असं सांगून प्रदीपने त्याला कॉल डिस्कनेक्ट करण्यास सांगितलं होतं.
दिनेशच्या मुलालाही सैन्यात पाठवणार
“दिनेश आणि इतर चार सैनिक नियंत्रण रेषेवर (LOC) गस्त घालत असताना उखळी तोफांच्या हल्ल्यात शहीद झाले. संपूर्ण देशाला त्याचा अभिमान आहे. त्याचं बलिदान कायम स्मरणात राहील. तो एक शूर सैनिक होता,” असं दया राम यांनी डबडबलेल्या डोळ्यांनी सांगितलं. दुखाच्या या क्षणात असतानाही ते अभिमानाने म्हणाले, माझे इतर दोन मुलंही सैन्यात आहेत. दिनेश यांचा मुलगाही भविष्यात सैन्यात जाऊन वडिलांचा वारसा पुढे नेईल.










