NCP: ‘लबाड, धूर्त आणि गद्दार…’ जयंत पाटील संतापले, अजित पवारांवर एवढी जहरी टीका?
Jayant Patil: शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी पहिल्यांदाच अजित पवार यांच्याविषयी अत्यंत संतप्त शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी गद्दार असंही यावेळी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
Jayant Patil vs Ajit Pawar: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून दोन्ही गट हे थेट टीका करणं टाळत आले आहेत. मात्र, आता शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एका लेखातून अत्यंत जहरी शब्दात अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका केली आहे. त्यामुळे आता हा वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण जयंत पाटील यांनी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार गटाला थेट ‘गद्दार’ म्हणून संबोधलं आहे. (liar cunning and scab jayant patil enraged first time venomous criticism of ajit pawar in ncp magazine)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मासिकातून जहरी टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचं एक मासिक आहे ज्यामधून जयंत पाटील यांनी अत्यंत जहरी शब्दात अजित पवारांवर टीका केली आहे. याच मासिकात जयंत पाटील यांनी अध्यक्षीय लेख लिहला आहे. ज्यामध्ये जयंत पाटलांनी लबाड, धूर्त, अप्रामाणिक, भ्रष्ट आणि डरपोक तसेच थेट गद्दार असंही म्हटलं आहे. यावेळी त्यांनी थेट अजित पवारांचं नाव घेणं टाळलं आहे. मात्र, त्यांचा सगळा रोख हा अजित पवारांकडेच होता.
जयंत पाटलांचा घणाघाती लेख, अजित पवारांवर जहरी शब्दात टीका
‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि ‘जय जवान-जय किसान’ नारा देणारे माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांची २ ऑक्टोबरला आपण देशभर जयंती साजरी केली. याच दिवशी महाराष्ट्राचे एक थोर सुपूत्र रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि देशाचे माजी अर्थमंत्री ‘सर’ चिंतामणराव देशमुख (सी.डी.) यांची पुण्यतिथी होती. ही पुण्यतिथी साजरी करून त्यांच्या कार्यकर्तृत्त्वाला सलाम करण्याचे भान आपल्या कुणालाही फारसे राहिलेले नाही याची सल आणि खंत प्रमाणिक व स्वाभिमानी माणसांच्या मनात निश्चित राहिल.’
हे वाचलं का?
‘सी.डी. देशमुखांची आठवण होणे हे ही कृतज्ञतेचे एक लक्षण आहे. अर्थात हल्ली कृतज्ञता, स्वाभिमान, निर्भिडपणा, करारी बाणा फार अपवादात्मक स्थितीतच पाहायला मिळतो. राजकारणात तर आता कृतघ्न माणसांचीच संख्या प्रचंड वाढून त्यांचे मोठे पीक आले आहे. किंबहुना पक्ष चोरणाऱ्यांचीच टोळी उभी राहताना दिसते आहे. या टोळ्या नुसत्या चोर आहेत अशातला भाग नाही. या टोळ्यांचे म्होरके अत्यंत लबाड, धूर्त, अप्रामाणिक, भ्रष्ट आणि डरपोक असून सत्याला सामोरे जाऊन धाडसाने त्याचा स्वीकार करण्याची त्यांची हिंमत नाही. त्यामुळे ईडीच्या धमकीने व तुरूंगात जाण्याच्या भीतीने व अनीतीने मिळविलेल्या मालमत्तेवर येणारी जप्तीची टाच रोखण्याच्या उद्देशाने बरेच नेते, आमदार व लोकप्रतिनिधी एका रात्रीत पक्ष बदलतात, निष्ठा विकतात, स्वाभिमान गहाण टाकतात, उपकार विसरतात.’
हे ही वाचा >> Dussehra Melava: अंगार-भंगारवरुन कोण भिडलं, संजय राऊत का संतापले?
‘एवढं करूनही थांबत नाहीत. ज्यांनी आपल्याला राजकारणात आणले, मान, प्रतिष्ठा, मंत्रीपदे व नेतृत्व करण्याची संधी देऊन जनमानसात काही एक स्थान निर्माण करुन दिले त्यांचेच स्थान व खुर्ची खेचून घेण्याचा प्रयत्न करतात हे आपण सध्या रोज उघड्या डोळ्यांनी पाहतो आहोत. हा कृतघ्नपणाचा केवढा कळस आहे. मी येथे जाणीवपूर्वक कुणाचेही नाव घेत नाही. पण फोडाफोडीचे, दमदाटीचे, प्रलोभनाचे, माणसे खोक्यांनी विकत घेण्याचे स्वार्थी व लबाड राजकारण करणारे नेते जेव्हा महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त झाडू हातात घेऊन स्वच्छता मोहीम राबविण्याचे नाटक करतात तेव्हा महात्मा गांधींच्या अंतःकरणात किती वेदना होत असतील याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही.’
‘अटकेच्या भितीने भाजपत गेलेले हे पळपुटे शूर व मर्द राजकारणी आहेत या भावनेने जनता त्यांच्याकडे आता पाहात नाही. त्यामुळे या सर्वांचा उल्लेख ‘गद्दार’ असाच होतो. ज्या महात्मा गांधींचे स्मरण म्हणून हाती झाडू घेण्याचे नाटक वठविले जाते त्या नाटक्यांनी महात्माजींचे “शूराची हिंसा परवडली पण नामर्दाची अहिंसा नको,” हे विचार व वाक्य एकदा आठवून ते स्वकृतीत आणण्याचा प्रयत्न करावा म्हणजे आपण जे वागलो व वागतो आहोत तो मार्ग योग्य आहे की अयोग्य आहे याच्या चिंतनाला निदान सुरूवात तरी होईल.’
‘मला एका गोष्टीचे फार नवल वाटले. पक्ष चोरणारे लोक किती धादांत खोटे बोलू शकतात याचा खासदार प्रफुल पटेल यांच्या पत्रकार परिषदेमुळे मला
साक्षात्कार झाला. २०२२ मध्ये नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टोडीयमवर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून एकमताने श्री. शरद पवार यांची निवड करण्यात आली. ही निवड करताना श्री. पितांबरन् मास्टर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. सर्व प्रक्रिया नियम व कायद्यानुसार पार पाडली गेली.’
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> क्रिकेटर रिझवानने उघड-उघड सांगितलं माझा Gaza ला पाठिंबा, ICC कारवाई करणार?
‘ही निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण होत असताना श्री. प्रफुल पटेल हे पवार साहेबांच्या शेजारच्या खुर्चीवरच बसून होते. इतकेच नव्हे तर अध्यक्षपदी साहेबांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांना सत्कार व स्वागताचे प्रतिक म्हणून जो पुष्पगुच्छ देण्यात आला त्यावेळी श्री. पटेल हे पवार साहेबांच्या शेजारीच उभे होते. त्यावेळचा तो सत्काराचा फोटो या महिन्याच्या राष्ट्रवादीच्या अंकात आम्ही आवर्जून छापला आहे.’
‘खोटं बोलण्याची देखील काही परिसीमा असते. या फोटोत महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचे खोटे व नकली अध्यक्ष म्हणून आज जे मिरवताहेत ते ही साहेबांच्या शेजारी उभे असलेले आपल्याला दिसतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पवार साहेबांनी जन्माला घातला आहे, स्वकर्तृत्त्वाने व स्वविचाराने उभा केला आहे. त्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. यामागे ६० वर्षांची तपश्चर्या व अविरत कष्ट आहेत. आज पक्षावर दावा करणारे आयत्या बिळात नागोबा म्हणून येवून बसले आहेत. पण जनता सत्य जाणते, खरं-खोटं अचूक ओळखते. ती योग्य वेळ येताच या नागोबांना बरोबर ठेचून काढेल याविषयी माझ्या मनात शंका नाही.’ अशा शब्दात जयंत पाटील यांनी अजित पवार यांचा समाचार घेतला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT