'मन मैं नथुराम, हरकते...' कुणाल कामराने पुन्हा शेअर केला नवा VIDEO, शिंदेंच्या सेनेला आणखी डिवचलं
ठाणे की रिक्षा, चेहरे पर दाढी... या गाण्याने वादात सापडलेला कुणाल कामरा याने आता पुन्हा एकदा एक नवा व्हिडिओ अपलोड करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
कुणाल कामराचा नवा व्हिडिओ
सरकार आणि सत्ताधाऱ्यांवर पुन्हा हल्लाबोल
शिवसेनेने केलेल्या तोडफोडीवर कुणाल कामराने आणला नवा व्हिडिओ
मुंबई: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने आपल्या नव्या व्हिडिओद्वारे पुन्हा एकदा केंद्र सरकार, भारतीय जनता पक्ष (BJP), आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हा व्हिडिओ, ज्याचं शीर्षक "हम होंगे कंगाल एक दिन" असं आहे, जो आज (25 मार्च) काही वेळापूर्वीच त्याच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला आहे. अवघ्या काही तासांतच हा व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे कामरा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने तो वादात सापडला होता, आणि आता या नव्या व्हिडिओने तो आणखी एका वादाला निमंत्रण देत असल्याचं दिसत आहे.
नवा व्हिडिओ शेअर करत कुणाल कामराने पुन्हा डिवचलं
कुणाल कामराच्या या नव्या व्हिडिओत त्याने "हम होंगे कंगाल एक दिन" हे गाणं गायलं आहे. ज्यामध्ये त्याने काल (24 मार्च) स्टुडिओमध्ये झालेली तोडफोड यावर या गाण्याच्या माध्यमातून कामराने टीका करत पुन्हा एकदा शिंदेंच्या शिवसेना नेत्यांना डिवचलं आहे.
पार्श्वभूमी आणि वाद
कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्याने वादात सापडला होता. 23 मार्च रोजी त्याने "नया भारत" नावाचा शो अपलोड केला होता, ज्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांनी मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओवर हल्ला चढवला होता. या घटनेनंतर 24 मार्च रोजी मुंबई पोलिसांनी कामराविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. या वादानंतरही कामराने हार न मानता हा नवा व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामुळे त्याच्यावरील टीका आणि कायदेशीर कारवाईचा धोका अधिक वाढला आहे.
कुणाल कामराची प्रतिक्रिया
या नव्या व्हिडिओसोबत कामराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने भारतीय संविधानाचा फोटो टाकून लिहिलं, “पुढे जाण्याचा एकमेव मार्ग.” त्याने आपल्या निवेदनात असंही म्हटलं की, “मी या जमावाला घाबरत नाही.” या विधानाने त्याची भूमिका स्पष्ट झाली आहे की, तो आपल्या मतांवर ठाम आहे.










