'...तर मराठी पैलवानावर अन्याय होईल', सिकंदर शेखसाठी खासदार सुप्रिया सुळेंकडून पंजाब सरकारशी बोलणी सुरु
MP Supriya Sule on Sikander Sheikh : ...तर मराठी पैलवानावर अन्याय होईल, सिकंदर शेखसाठी खासदार सुप्रिया सुळेंची पंजाब सरकारशी बोलणी सुरु, रोहित पवारांची माहिती
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सिकंदर शेखसाठी खासदार सुप्रिया सुळेंची पंजाब सरकारशी बोलणी सुरु
आमदार रोहित पवारांनी x वरुन दिली माहिती
MP Supriya Sule on Sikander Sheikh , सोलापूर : अवैध शस्त्रास्त्र तस्करीच्या प्रकरणात अडकलेल्या महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी अटक केल्याने कुस्तीविश्वात मोठी खळबळ माजली आहे. सिकंदरला जाणूनबुजून फसवलं गेल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे अॅक्टिव्ह झाल्या आहेत. "सिंकदर शेखला चुकीच्या पद्धतीने अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल", हा विचार करुन सुप्रिया सुळेंनी पंजाब सरकारशी बोलणी सुरु केली आहे. याबाबतची माहिती कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. रोहित पवार यांनी काय म्हटलंय सविस्तर जाणून घेऊयात..
रोहित पवारांची पोस्ट जशीच्या तशी
रोहित पवार म्हणाले, पै. सिकंदर शेख हा एक गुणी पैलवान असून त्याने आतापर्यंत केवळ त्याच्या गुणवत्तेवरच कुस्ती क्षेत्रात स्वतःचं असं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं. कुस्ती सोडून गुन्हेगारी क्षेत्रात तो जाईल, यावर आमचा बिलकूल विश्वास नाही, कदाचित कुस्तीमध्ये त्याची होत असलेली प्रगती पाहून कुणीतरी त्याला जाणीवपूर्वक अडकवण्याचा प्रयत्न केला असू शकतो. याबाबत महाराष्ट्र सरकारने पंजाब सरकारशी बोलून सिकंदरवर कोणताही अन्याय होणार नाही, याची काळजी घ्यावी. अन्यथा चुकीच्या पद्धतीने त्याला अडकवल्यास ते लंबी रेस का घोडा असलेल्या एका मराठी पैलवानावर अन्याय करणारं ठरेल. यासंदर्भात खा. सुप्रियाताईंच्या माध्यमातून पंजाब सरकारशी बोलण्याचा प्रयत्न सुरु असून यातून सकारात्मक मार्ग निघेल, असा विश्वास आहे.
हेही वाचा : Pune: भर दिवसा पुणे हादरलं... आंदेकर टोळीचा ‘मुळशी पॅटर्न’, 'त्या' रिक्षा चालकाला एका मिनिटात संपवलं कारण...
सिकंदर शेखचे वडिल काय म्हणाले?
"लवकरच हिंदकेसरी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत तो सहभागी होऊ नये म्हणून सिकंदरला खोट्या प्रकरणात ओढलं गेलं. सिकंदर किंवा आमच्या कुटुंबावर यापूर्वी कधीही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. आम्ही साधी, गरीब माणसं आहोत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या बाबतीत पंजाब सरकारशी चर्चा करावी, ही माझी नम्र विनंती आहे. सिकंदरने आतापर्यंत कुस्तीतील अनेक पदके मिळवली आहेत आणि त्याचं स्वप्न भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचं आहे," असं सिकंदरचे वडील रशीद शेख यांनी सांगितलं.










