Mumabi Tak Baithak: देवेंद्र फडणवीसांचं रोहित पवारांनी केलं कौतुक, पण नेमकं कशासाठी?

मुंबई तक

मुंबई Tak बैठक या विशेष कार्यक्रमात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाले रोहित पवार.

ADVERTISEMENT

mumbai tak baithak why rohit pawar liked devendra fadnavis as the leader of opposition politics Marathi News
मुंबई Tak बैठकमध्ये रोहित पवार
google news

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबई तक बैठकीत विविध राजकीय मुद्द्यांवर आपली रोखठोक मतं मांडली. यावेळी त्यांनी  देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षनेते म्हणून केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी अत्यंत प्रभावी काम केले आहे. ते विरोधी पक्षात असताना सरकारची एखादी चूक किंवा गोष्ट इतकी मोठी करून दाखवायचे की, सत्तेत बसलेल्या लोकांनाही त्याचे आश्चर्य वाटायचे." 

मात्र, यासोबतच फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले, "फडणवीस हे पेशाने वकील आहेत. त्यामुळे ते अशी काही विधाने करतात, ज्यातून त्यांना नंतर सोयीस्करपणे 'यू-टर्न' घेता येतो. त्यांना शब्दांचा खेळ फार उत्तम जमतो."

'आमचा पक्ष फुटणार नाही'

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात फूट पडणार का? यावर उत्तर देताना त्यांनी पक्षात कोणतेही 'ऑपरेशन' होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आणि आमचा पक्ष फुटेल असे आपल्याला वाटत नसल्याचे स्पष्ट केले. विरोधकांच्या आंदोलनांविषयी बोलताना त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा दाखला दिला. आमच्या आंदोलनामुळेच आज कांदा 30 रुपये किलो झाला आहे, असे सांगत त्यांनी आगामी काळात सर्व विरोधकांनी एकत्रितपणे पुढे जाणे गरजेचे असल्याचे मत मांडले. तसेच, विधानसभा अधिवेशनात विरोधकांचे प्रश्न मुद्दाम मागे ठेवले जातात, त्यामुळे आपल्याला अजून जास्त आक्रमक होण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 

हे ही वाचा>> Mumbai Tak Baithak: ठाकरेंची शिवसेना कायम का फुटते? आदित्य ठाकरे म्हणाले...

'जनतेचा विश्वास कमी झालाय'

सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे जनतेचा नेत्यांवरून विश्वास उडत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. "लोकांचा सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांवरचा विश्वास कमी झाला आहे, म्हणूनच लोक आंदोलनात उतरताना दिसत नाहीत. पण आम्ही सातत्याने लोकांसाठी लढत राहू. याला थोडा वेळ लागेल, पण जनतेकडून नक्कीच प्रतिसाद मिळेल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हे वाचलं का?