नांदेडचा 'नारायण वाघ' चर्चेत, 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'ची कॉपी; नेमकं काय घडलं?
Nanded News : नांदेडचा 'नारायण वाघ' चर्चेत, 'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजराची कॉपी; नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
नांदेडचा 'नारायण वाघ' चर्चेत
'गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा'ची कॉपी
नेमकं काय घडलं?
Nanded News, धर्माबाद : धर्माबाद नगरपालिकेच्या निवडणुकीत एका अनोख्या प्रकारामुळे निवडणूक कार्यालयात क्षणभर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अर्ज भरत असताना एका उमेदवाराने पारंपरिक पद्धत सोडून वेगळ्याच अंदाजात अनामत रक्कम जमा केली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवाराने एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांतून जमा केलेली अनामत रक्कम घेऊन कार्यालयात हजेरी लावल्याने निवडणूक अधिकाऱ्यांची चांगलीच परीक्षा पाहायला मिळाली. उमेदवाराने गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमातील नारायण वाघची स्टाईल वापरल्याने जोरदार चर्चा रंगली आहे.
नांदेडच्या 'नारायण वाघ'ची सोशल मीडियावर तुफान चर्चा
अर्ज सादरीकरणाच्या अंतिम दिवशी हा प्रकार घडला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले भगवान कांबळे हे आपल्या पत्नीच्या नावाने उमेदवारी नोंदवत होते. मात्र, त्यांची एन्ट्रीच चर्चेचा विषय ठरली. त्यांनी हातात लहान मुलांचा पैसे जमा करण्याचा डब्बा घेत नगरपरिषद कार्यालयाच्या हद्दीत प्रवेश केला. या डब्ब्यात एक-एक रुपयांची नाणी भरलेली होती. हीच चिल्लर रक्कम ते अनामत म्हणून जमा करणार असल्याचे त्यांनी कागदपत्रे देताना सांगितले.
निवडणूक अधिकाऱ्यांसाठी ही परिस्थिती काहीशी अवघड ठरली. शेकडो नाणी मोजण्यासाठी वेळ लागणार हे स्पष्ट होताच कर्मचारी आणि अधिकारी दोघेही काय करावे हे समजत नव्हते. शेवटी वेळेची बचत करण्यासाठी अधिकाऱ्यांनी नाणी एकेक करून मोजण्याऐवजी ती थेट त्यांच्या ट्रेमध्ये रिकामी करून स्वीकारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उमेदवाराची प्रक्रिया पूर्ण झाली आणि कार्यालयातील कामकाज पुन्हा सुरळीत सुरू झाले.
या अनोख्या शैलीबद्दल विचारले असता भगवान कांबळे म्हणाले, “माझ्या भाचीने कौतुकाने जमा केलेली ही रक्कम मी अनामत म्हणून भरली.” त्यांच्या या विधानानेही उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. कांबळे हे धर्माबाद शहरात ‘जीवन संघर्ष’ रुग्णवाहिका सेवा आणि ‘स्वर्गरथ’च्या माध्यमातून सतत लोकांच्या सेवेत असतात. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कांबळे यांनी या चिल्लर रकमेच्या माध्यमातून लोकांचे लक्ष वेधून घेतले.










