समजून घ्या: विधान परिषद निवडणूक कोटा कसा ठरतो? ठाकरेंना किती मतं लागणार?
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. अशावेळी विधान परिषदेवर निवडून जाण्यासाठी नेमका कोटा किती लागतो आणि त्याची मोजणी कशी होते हे आपण सविस्तरपणे समजून घेऊया.
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा विधान परिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. 9 निवृत्त सदस्यांच्या जागेवर आणि 1 पोटनिवडणूक. हे 10 आमदार विधानसभेतल्या आमदारांकडून निवडून जाणार असल्याने पक्षीय बलाबल महत्वाचं ठरतं. विधान परिषदेच्या या निवडणुका कशा होणार आहेत? त्याचा कोटा कसा ठरतो? हेच आपण समजून घेऊया.
देशात 6 राज्यांमध्येच विधानपरिषद आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. राज्याच्या निर्मितीपासून जरी विधान परिषद नसली तरी ती नव्याने आणता येते, आणि एखाद्या राज्यात असलेली विधान परिषद ही नष्टही करता येते. पंजाब, पश्चिम बंगाल, तामिळनाडूने तसं केलं आहे. जम्मू आणि काश्मिरमध्ये या राज्याचीही आधी विधान परिषद होती, मात्र केंद्रशासित प्रदेश झाल्यामुळे ती नष्ट झाली.
विधान परिषदेची जास्तीत जास्त सदस्य संख्या ही त्या राज्याच्या विधानसभेच्या सदस्य संस्थेपेक्षा एक तृतीयांश असू शकते. आणि किमान सदस्यसंख्या ही 40 असते.
विधान परिषदेचे आमदार कुठून निवडून येतात?
विधान परिषदेच्या आमदाराचा कार्यकाळ हा 6 वर्षे असतो. दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असतात आणि त्यांच्या जागी नव्या आमदारासाठी निवडणूक होते. मात्र विधानसभेचे सरसकट सर्व आमदार हे जनतेमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी असतात तसं विधान परिषदेत नसतं.









