देवेंद्र फडणवीसांनी ‘गद्दारी’वरून डिवचले, शरद पवारांनी काढला सगळा इतिहास
पवारांनी केली, तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय”, असा सवाल करत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचलं.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Vs Devendra Fadnavis : “1978 मध्ये वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून शरद पवार आमदार घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत मुख्यमंत्री झाले. त्यांनी केली तर ती मुत्सद्देगिरी आणि तेच शिंदे यांनी केले तर गद्दारी? हा कुठला न्याय”, असा सवाल करत उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना डिवचलं. फडणवीसांनी केलेल्या याच विधानाला उत्तर देताना पवारांनी फडणवीसांना इतिहास सांगितला.
शरद पवार यांनी बारामती येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षाच्या बैठकीत झालेल्या चर्चेबद्दल माहिती दिली. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानावर पवारांनी सडकून टीका केली.
भाजपची टीका, पाटण्यातील बैठकीवर पवार म्हणाले…
विरोधी पक्षाच्या पाटण्यातील बैठकीवर 19 पक्षाचे पंतप्रधान एकत्र आले होते, अशी भाजपकडून टीका केली गेली. यावर शरद पवार म्हणाले, “अशा प्रकारचं जे भाष्य करतात, ते पोरकटपणाचं भाष्य आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदाबद्दल चर्चा सुद्धा झाली नाही. चर्चा झाली ती, महागाई, बेरोजगारी आणि काही ठिकाणी सामाजिक घडी बिघडवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला. समाजासमाजामध्ये अंतर कसं होईल, याची खबरदारी घेण्यासाठी भाजप पावलं टाकत आहे. कुठल्याही राज्यात जाती, धर्म यातून मतभेद वाढले तर समाजाच्या दृष्टीने ते चांगले नाहीत. त्यासाठी या सगळ्या गोष्टींना आवर घालण्यासाठी आपण एकत्र बसण्याची गरज आहे, हा चर्चेचा विषय होता.”
हेही वाचा >> मविआ की युती… महाराष्ट्रात बीआरएस, वंचित बहुजन आघाडी कुणासाठी घातक?
चंद्रशेखर बावनकुळेंना पवारांचे खडेबोल
“गेल्या दोन-तीन दिवसांपासून मी बघतोय की, अनेक तथाकथित नेते म्हणतात की, हे लोक जमले का? यांची बैठक कशी काय घेतली? अरे लोकशाहीमध्ये बैठक घ्यायला परवानगी नाही का? भाजपचे राज्याचे अध्यक्ष त्यांचं नाव माझ्या लक्षात नाही. त्यांचं एक विधान आलं की, या बैठकांची गरज काय होती? दुसऱ्या दिवशी त्यांचं आणखी एक विधान आलं की, मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. अरे तुम्हाला बैठका घेता येतात आणि इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते? माझ्या मते ज्याला मॅच्युअर पॉलिटिशियन असावे म्हणतात, त्याची कमतरता आहे, यापेक्षा जास्त सांगण्याची गरज नाही.