NCP: अजितदादांना ठणकावलं; शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं!
मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत शरद पवार यांनी जबरदस्त भाषण केलं. वाचा शरद पवार यांचं संपूर्ण भाषण.
ADVERTISEMENT
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) ऐतिहासिक बंड झालं असून त्याविरोधात वयाच्या 83 व्या वर्षी देखील शरद पवार (Sharad Pawar) हे दंड थोपटून ठामपणे उभे राहिले आहेत. आज (5 जुलै) झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या जरी कमी असली तरी आपण अद्यापही उमेद हरलेलो नाही आणि हरणार नाही हेच शरद पवार यांनी आपल्या भाषणातून आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. यावेळी शरद पवारांनी अतिशय तडाखेबंद असं भाषण केलं. वाचा शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं.. (sharad pawar powerful speech ncp meeting yashwantrao chavan center mumbai full speech criticized ajit pawar maharashtra political news live)
ADVERTISEMENT
शरद पवारांचं भाषण जसंच्या तसं
आजची बैठक ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशाचं लक्ष या बैठकीकडे आहे. संपूर्ण देशात चर्चा आहे की, 24 वर्षांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाला. षण्मुखानंदमध्ये बैठक झाली आणि शिवाजी पार्कवर मोठी सभा झाली. 24 वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलं.
कुणी खासदार झालं, कुणी आमदार झाले. मंत्री झाले. सामान्य कुटुंबातील मुलगा राजशकट चालू शकतो हे राष्ट्रवादीने दाखवून दिलं. महाराष्ट्रातील शेवटच्या माणसांमध्ये प्रकाश कसा येईल, याची काळजी घेतली. त्यात यशस्वी झालोय. आपल्याला पुढे जायचं आहे. संकट खूप आहेत.
ज्यांची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही, त्यांच्या हातात देशाची सुत्रं आहेत. त्यांच्या पुढं त्यांच्या सहकाऱ्यांनाही मनातील कल्पना मांडण्याच्या मर्यादा आहे. मी अनेकांच्या सरकारांमध्ये मंत्री म्हणून काम केलंय. दिल्लीत विरोधी पक्षनेता म्हणून काम केलं. त्या सगळ्यांच्या कामाची पद्धत बघितली. एखादी गोष्ट बरोबर नसेल, तर जनतेची भावना वेगळी असेल, तर त्यासंबंधी सुसंवाद साधणं त्यातून मार्ग काढणं हे सुत्रं या देशात अनेक वर्षांपासून सुरू आहे.
हे वाचलं का?
आज संवाद संपला आहे. लोकशाहीत विरोधक असो वा सहकारी, यांच्यात सुसंवाद असायला हवा. मी मुख्यमंत्री असताना माझी पद्धत होती की, एखादा महत्त्वाचा निर्णय आपण घेतला की, त्याबद्दल सामान्य माणसाची काय प्रतिक्रिया आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर संवाद ठेवावा लागतो. ऐकून घ्यावं लागतं. अयोग्य असेल, दुरुस्त करण्याची भूमिका ठेवावी लागते.
आज देशात संवाद नाही. आम्ही सगळे सत्ताधारी पक्षात नाहीये. पण, लोकांच्या मध्ये आहोत. त्यामुळे कधीकाळी दुःखाची स्थिती समजते. त्यातून मार्ग काढण्याची इच्छा असते. पण, कार्यकर्त्यांचा आणि सहकाऱ्यांचा संवाद नसेल तर या सगळ्या गोष्टींवर मर्यादा येतात. देशातील जनतेमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे.
एका बाजूला हे चित्र आणि दुसऱ्या बाजूला आम्ही लोकांनी लोकशाही टिकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सत्ताधारी पक्षात नसलेल्या संघटीत करण्यासाठी काही बैठका घेतल्या. पाटण्यात आम्ही जमलो. बंगरुळुला आम्ही पुन्हा एकत्र येत आहोत. देशाच्या प्रश्नांची चर्चा करणार आहोत. कुठलाही व्यक्तिगत विषय तिथं मांडत नाही. हे जसं घडायला लागलं, तर ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्यात अस्वस्थता निर्माण व्हायला लागली.
आठ दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी भोपाळमध्ये एक भाषण केलं. त्यांनी सांगितलं की, काँग्रेस पक्षाने इतक्या लाख कोटींचा भ्रष्टाचार केला. राष्ट्रवादी काँग्रेसने 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार केला. हे सांगताना राज्य सहकारी बँक, पाटबंधारे खातं याचा उल्लेख केला.
ADVERTISEMENT
पंतप्रधानांनी विधाने केली. या पंतप्रधानांचं एक वैशिष्ट आहे. एकदा ते बारामतीला आले आणि बारामतीच्या सभेत त्यांनी सांगितलं की, देश कसा चालवायचा? प्रशासनं कसं चालवायचं, हे पवार साहेबांचं बोट धरून मी शिकलो. त्याच्यानंतर निवडणुकीच्या काळात आले आणि प्रचंड शिवीगाळ केली. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांनी बोलताना काळजी घेतली पाहिजे.
फक्त आरोप करून चालणार नाही. खरंच चुकीचं काम केलं असेल, तर त्यासंबंधीची कारवाई केली पाहिजे. त्यात जे सत्य सापडलं ते सांगितलं पाहिजे. पण, त्यांनी एव्हढी धमक दाखवली नाही. त्याचं कारण हे आहे की, आपण देशाचे नेते आहोत. राजकीय पक्षाचे नेते आहेत, पण ज्यावेळी देशाचा नेता म्हणून आपण जनमानसाच्या समोर बोलतो, त्यावेळी त्या प्रकारची सभ्यता आणि मर्यादा पाळल्या पाहिजे. त्या पाळल्या जात नाही.
ADVERTISEMENT
त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका भ्रष्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल, तर कालच्या शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर का घेतलं. हे राज्यकर्ते पाहिजे ते बोलतात. आधार नसलेल्या गोष्टी बोलतात आणि जनमानसात वातावरण तयार करण्याचे प्रयत्न करतात.
विधिमंडळाचे सदस्य, सत्ताधारी पक्षाचे आमदार, खासदार अनेकजण मला खासगीत सांगतात की, असं असं घडलंय. चर्चा करता येत नाही विचारलं तर ते म्हणतात शक्य नाही. इंदिरा गांधी, राजीव गांधी, नृसिंहराव, मनमोहनसिंग यांच्या काळात मंगळवारी खासदारांची बैठक व्हायची आणि मग खासदार आपल्या भागातील प्रश्न मांडत. आज संवाद संपला. बोलायची हिंमत नाही. हा देश आपल्या मुठीत ठेवून चालवू शकतो, ही स्थिती निर्माण झालेली आहे.
आमदारांना दमदाटी, नवी पिढी तयार करण्यासाठी प्रयत्न केले, तर त्यात अडथळे आणायचे. अनेक गोष्टी आहेत. काही लोकांनी बाजूला जायची भूमिका घेतली. माझी काही तक्रार नाही, पण दुःख आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विधिमंडळात आणण्यासाठी कष्ट केले. त्यांच्या कष्टातून निवडून आले. ज्या कार्यकर्त्यांनी चांगले दिवस आणले, हे त्यांनाच विश्वासात न घेता. पक्षाला विश्वासात न घेता, वेगळी भूमिका घेतली आणि जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही. मागच्या निवडणुकीत जे मांडलं, त्यांची संमती घेतली. त्या विचाराच्या पंगतीला जाऊन बसणं, लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.
राज्य नाही, त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण, दिसतंय काय? पक्षाच्या ऑफिसमध्ये गडबड केली. काही लोकांनी ताबा घेतला. ऑफिस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, तुम्ही राष्ट्रवाद काँग्रेसमध्ये आहात का? तुम्ही सांगितलं की आम्हीच राष्ट्रवादी काँग्रेस. उद्या कुणी उठलं आणि मी काँग्रेस पक्ष सांगायला गेलं, मी शिवसेना आहे, मी भाजप आहे सांगायला गेलं, तर याला काय अर्थ आहे. त्यामुळे अशाप्रकारचं मत सांगून भूमिका मांडून एकप्रकारे ताबा घेणं ही गोष्ट लोकशाहीमध्ये अयोग्य आहे पण, ती झाली.
माझं उदाहरण सांगतो. आम्ही काँग्रेसमध्ये होतो. टिळकभवन आमच्या ताब्यात होतं. नवीन पक्ष काढण्याचा निर्णय आम्ही घेतला, तेव्हा टिळकभवन सोडून दिलं. कारण ती संपत्ती काँग्रेस पक्षाची होती. ती हिसकावून घेण्याची आवश्यकता नव्हती. आमच्या हातात होतं. काय झालं नाशिकला? पक्षाची मालमत्ता, काही लोक येतात. पोलिसांची मदत घेतात आणि ताब्यात घेतात. सांगतात की, हा पक्ष आमचा आहे. घड्याळ चिन्ह आमचं आहे. ठिक आहे. तुम्ही म्हणून शकता, पण निवडणूक आयोगाने घड्याळाची खुण कुणाला दिलीये हे संपूर्ण देशाला माहितीये.
तुमच्यासाठी म्हणून सांगतो खुण कुठे जाणार नाही, ही गोष्ट खरी आहे. खुण हे देशाचं राजकारण ठरत नाही. मी अनेक अनेक निवडणुका लढलो. पहिली निवडणूक लढलो, तेव्ह खुण बैलजोडी होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये दोन भाग झाले. त्यात आमची खुण गेली. मग आमची खुण आली गाय वासरू. त्यानंतर चरखा आला, नंतर पंजा आला. त्यानंतर घड्याळ आलं. आम्ही चिन्हांवर लढलो. त्यामुळे कुणी सांगत असेल की, चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही. कोणतंही चिन्ह असो, सामान्य माणसाच्या अंतःकरणात त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका सखोल आहे, तोपर्यंत काहीही काळजी करण्याचं कारण नाही.
आज अनेक गोष्टी सांगता येतील. मी काही मित्रांना त्यांच्याबद्दल भाष्य करू इच्छित नाही. काही लोकांनी भाषणं केली. माझ्याबद्दल बोलले. त्यांनी हे सांगितलं की ते माझे गुरू आहेत. माझ्या काही मित्रांची बैठक झाली. त्यांच्या पाठीमागचे फोटो बघितले का? त्यात सगळ्यात मोठा फोटो होता माझा. मुंबईत सुद्धा अनेक पोस्टर्स लागली, त्यावर माझा फोटो होता. त्यांना माहितीये की आपलं नाणं चालणार नाही. त्यामुळे जे नाणं चालेल ते चालणार नाणं घेतलं पाहिजे. कारण त्यांचं नाणं खरं नाहीये. खणकन वाजत नाहीये. नको उगीच अडचण लावून टाका तो फोटो.
काहींनी भाषणं केली. त्याचा उल्लेख अनेकांनी केला. पांडुरंगा बडवे येऊ देत नाहीत. कसले बडवे, कसलं काय? पांडुरंगाच्या दर्शनाला या देशात, या राज्यात कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपुरला जावं लागतं असं नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोक वारीमध्ये जातात. उन्हातान्हातून जातात. अंतःकरणात एकच भावना असते की, पांडुरंगाचं दर्शन घ्यावं. पंढरीला पोहोचल्यानंतर मंदिरात सुद्धा जाता येत नाही. मंदिराला नमस्कार करतात आणि आनंदाने परत जातात. त्यामुळे ही अवस्था आपल्या सर्वांच्या समोर आली.
हे ही वाचा>> NCP: अजित पवारांची मोठी खेळी! थेट राष्ट्रीय अध्यक्ष पदावर सांगितला दावा
पांडुरंग म्हणायचं. आणखी काय काय म्हणायचं. गुरू म्हणायचं. आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं सांगायचं. मला आठवतंय की, असेच नेते, दुर्दैवाने तुरुंगात गेले. तिथे वर्ष सहा महिने राहिले. जे प्रयत्न करायचे होते, ते प्रयत्न झाले. सुटका झाली. निवडणुका आल्या. मला काहींनी सांगितलं त्यांना संधी देऊ नका, निकाल लागेपर्यंत. मी म्हणालो त्यांच्यावर अन्याय झाला असं मला वाटतं, त्या अन्यायामुळे त्यांना आत बसावं लागलं. अशा वेळी त्यांना तोंडघशी पडू देणार नाही. त्याच्यामागे उभा राहीन. तिकीट दिलं, सरकार आलं आणि मंत्रिमंडळात शिवाजी पार्कमध्ये शपथ घेताना दोन लोकांची नावं द्यायची होती. पहिलं नाव त्यांचं दिलं. ही भूमिका आपण घेतली.
मला आठवत तीन दिवसांपूर्वी सकाळी मला फोन आला. म्हणाले, साहेब हे काय चाललं? मी म्हणालो मलाही माहिती नाही काय चाललंय. पण, काहीतरी चालू आहे. ते म्हणाले, ठिक आहे. असं करतो की, मी जातो, बोलतो आणि तुम्हाला कळवतो. नंतर तीन वाजता की दोन वाजता मी पाहिलं की त्यांनी शपथच घेऊन टाकली. भारी माणसं आहेत. बघून येतो. त्यामुळे इथून पुढे बघून येतो हे सांगितलं की, जरा जपून. कारण काय करेल याचा नेम नाही.
कमीत कमी राज्यकर्ते तरी असे असले पाहिजे की त्यांनी राज्य एकत्रित ठेवावं. राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, भाजपचे. अनेक वेळा भाषणं केली की हे राज्य तोडलं पाहिजे. वेगळा विदर्भ केला पाहिजे. वेगळा विदर्भ केल्याशिवाय मी असं करणार नाही, तसं करणार नाही. आज काय झालं, विदर्भाच्या प्रश्नामध्ये हे लोक किती लक्ष घालतात, याची खात्री देत येत नाही. दिलेला शब्द कुणी पाळत नाही. कारण नसताना आज एक प्रकारची राज्याला ऐक्याला सुरूंग लावण्याची भाषा या लोकांनी कधीकाळी बोललेली आहे. कसं राज्य चालेल?
आज आपले काही सहकारी गेले. आपण अस्वस्थ आहोत. 8-10 दिवसांपूर्वी त्यांचं भाषण ऐकलं की, महाराष्ट्राच्या इतिहासात असला मुख्यमंत्री आला नाही. आता असल्या मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आज नमस्कार म्हणून काम करायचं. याबद्दल काय सांगायचं. आपण कुणाबरोबर काम करतोय.
असं सांगितलं गेलं की, शरद पवारांनी सुद्धा पुलोद सरकार बनवलं होतं. हो, बनवलं होतं. आणीबाणीच्या नंतर निर्णय सगळ्यांनी मिळून घेतला होता. सगळ्यांनी मिळून मला सांगितलं की, इथलं नेतृत्व तुम्ही करा. पण, जो पक्ष होता, तो भाजपन नव्हता. त्या पक्षाचं नाव जनता पक्ष होतं. जयप्रकाश नारायण यांच्या विचारातून जे पक्ष जन्माला आले, बाकीचे सगळे पक्ष विसर्जित करण्यात आले आणि त्यानंतर एक पक्ष केला, तो भाजप नव्हता, जनता पक्ष होता. त्यांच्या मदतीने इथेच नव्हे, तर देशपातळीवर मोरारजी देसाई नेतृत्वाखाली हा पक्ष केलेला आहे.
असं सांगण्यात आलं की, आम्ही भाजपबरोबर गेलो चुकलं काय? सांगितलं की नागालँडमध्ये तुम्ही परवानगी दिली. हे खरं आहे. नागालँडमध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार निवडून आले. एक गोष्ट लक्षात ठेवा, नागालँड असेल, मणिपूर असेल हा भाग, शेजारचे देश एक चीन, दुसरा पाकिस्तान. सीमेवर छोटी छोटी राज्ये आहेत, त्यांच्याबद्दल अतिशय बारकाई विचार करून निर्णय घ्यावे लागतात. तिथे उद्रेक झाला. शेजारच्या देशाने त्याचा गैरफायदा घेतला तर त्याची किंमत संपूर्ण देशाला द्यावी लागते. त्यामुळे आपण तिथे बाहेरून पाठिंबा दिला. इथं काय घडलं, इथं आत जाऊन बसले. आणि उदाहरण हे देतात, हे ठिक नाही.
भाजपबरोबर आम्ही गेलो यात काही चुक नाही. जे जे लोक या देशात भाजपबरोबर गेले, त्या प्रत्येकाचा इतिहास आठवा. पंजाबमध्ये अकाली दल आणि भाजपचं सरकार बनलं. सरकार चाललं नाही. त्या पक्षात एकजूट होती, ती उद्ध्वस्त करण्याचं काम केलं गेलं. आज तेलंगणातही तेच झालं. शेजारच्या राज्यात तेच झालं. बिहारमध्ये नितीश कुमारांना निर्णय घ्यावा लागला की, भाजपला सोडण्याशिवाय गत्यंतर नाही. वेगळे झाले.
भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाल्यानंतर काही महिने ठिक चालतं. नंतर सहकारी उद्ध्वस्त करणं, त्याची मोडतोड करणं हे सुत्र भाजपचं आहे. त्यामुळे तुम्ही जायचा निर्णय घेतला. तुम्ही पक्षात बसून घेतला असता तर अधिक चांगलं झालं असते. ही गोष्ट लक्षात ठेवा की देशातील राज्यांत जे घडलं त्यापेक्षा वेगळं इथं घडणार नाही.
हे ही वाचा>> ‘अजित पवारांचं नाणं खोटं म्हणून माझा फोटो लावला’, शरद पवारांचा पहिला हल्ला
शिवसेनेचे हिंदुत्व आहे, ते लपून ठेवत नाही. पण, ते हिंदुत्व अठरापगड जातींना घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. हे हिंदुत्व आहे. भाजपचे जे हिंदुत्व आहे, ते विभाजनवादी, विखारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसांमाणसांतील अंतर वाढवणार आणि विद्वेष वाढवणारं हे हिंदुत्व आज भाजपच्या वतीने केलं जातं. मधल्या काळात राज्यात दंगली झाल्या. शाहू महाराजांच्या कोल्हापुरात दंगल व्हावी. अकोल्यात दंगल झाली. नांदेडला झाली. आणखी काही ठिकाणी झाल्या. या दंगलीत कोण होतं, हे सगळ्या देशाला आणि जगाला माहिती आहे. जाणीव पूर्वक ह्या दंगली केल्या. जिथे आपली सत्ता नाही, त्या ठिकाणी समाजासमाजामध्ये विद्वेष वाढवायचा आणि राजकीय फायदा घेता येईल का अशी भूमिका त्यांची आहे. जो समाजाच्या ऐक्याला तडा लावतो. जाती समाजातील अंतर वाढवतो, तो राष्ट्रप्रेमी असू शकतो. जे राष्ट्रप्रेमी नाहीत, त्यांच्याबरोबर जाण्याची भूमिका आम्ही घेणार नाही.
1980 मध्ये आमचे 68 आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षाचा नेता होतो. काही कामासाठी इंग्लंडला गेलो होतो आणि परत आलो. 68 पैकी 62 लोक गेले होते. मी 6 लोकांचा नेता राहिलो. सगळे म्हणाले आता सगळं संपलं. नंतर चार वर्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दौरे केले. महाराष्ट्र पिंजून काढला. जे 62 गेले, त्यातील 4 सोडून सगळे पडले. आणि पुन्हा 68 लोक नवीन निवडून आले. नवीन चेहरे आले. त्यामुळे कुणी गेलं, त्याची चिंता करू नका. गेले जाऊद्या. त्यांना सुखाने तिथे राहू द्या.त्याच्याबद्दल आपली काही तक्रार नाही. आपल्या सामूहिक शक्तीतून नव्या कर्तृत्वान सहकाऱ्यांची पिढी आपण निर्माण करू. सुरेश भटांच्या दोन ओळी मला आठवतात. उषःकाल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT