शरद पवारांची निवृत्ती : कार्यकर्त्यांचा सभागृहातच गोंधळ, घोषणा मागे घेण्याची मागणी
शरद पवार यांच्या निवृत्तीच्या अचानक केलेल्या घोषणेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. मुंबईत ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्र पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी याबाबतची घोषणा केली. “कोठेतरी थांबणे आवश्यक आहे, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पुढील अध्यक्ष कोण याबाबतचा निर्णय घ्यावा. तसंच सध्याची राज्यसभेची टर्म संपल्यानंतर पुन्हा निवडणुकीला उभं राहणार नाही. आता नवी जबाबदारी नको, असं म्हणतं त्यांनी पक्षाच्या आणि संसदीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. (The sudden announcement of Sharad Pawar’s retirement has created an uproar among NCP activists and leaders)
ADVERTISEMENT
दरम्यान, शरद पवार यांच्या या अचानक केलेल्या घोषणेने राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात कार्यकर्ते आणि नेते भावूक झाले असून पवारांनी निवृत्तीची घोषणा मागे घ्यावी अशी मागणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्य जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह आमदार धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड हे सर्वजण भावूक झाल्याच दिसून आलं. धनंजय मुंडे यांनी पाया पडून शरद पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. सर्व कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर येऊन पवारांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली.
या गोंधळानंतर उपस्थितांना उद्देशुन अजित पवार म्हणाले, तुमच्या सर्वांच्या भावना शरद पवार साहेबांपर्यत पोहचल्या आहेत. साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की, समिती नेमली आहे. त्या समितीने लोकांचा कौल काय हे पाहुन निर्णय घ्यावा, ही समिती जो काही निर्णय घेईल तो मला मान्य असेल. समिती म्हणजे कोणी काही बाहेरचे लोक नाहीत. राष्ट्रवादीमधील लोक आहेत. आम्ही तुमच्या मनातील निर्णय घेऊ असं अजित पवार म्हणाले.
हे वाचलं का?
तर प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुमच्या भावना किती ज्वलंत आहेत, हे साहेबांपर्यंत पोहचले आहे. पण यापूर्वी शरद पवार साहेब यांनी कोणालाही विश्वासात घेतले नव्हते. त्यामुळे जसा तुम्हाला धक्का तसाच आम्हालाही सर्वांना धक्का बसला. शरद पवार यांच्या नेतृत्वाची देशाला, राज्याला आणि पक्षाला गरज आहे. त्यामुळे आम्हा सर्वांची त्यांना विनंती राहिल की त्यांनी हा निर्णय मागे घ्यावा, आणि निर्णयाचा पुनर्विचार करावा. तसंच आताच त्यांनी ठोस भूमिका जाहीर करावी, असं म्हणतं प्रफुल्ल पटेल यांनीही पवारांना विनंती केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT