‘मोदी युगात हिंदुत्व कमालीचे…’, भाजपला सुनावलं, शिवसेना (UBT) का भडकली?
हरयाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष धनखड यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतना शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत.
ADVERTISEMENT

“मोदी युगात अशा बुवाबाजीस महत्त्व मिळाले. कारण अशा विज्ञानशून्य हिंदुत्वावरच भारतीय जनता पक्षाची चूल पेटते आहे”, असं म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपच्या राजवटीत बुवाबाजी आणि अंधश्रद्धेचं पीक आल्याचे म्हटले आहे. हरयाणाचे भाजप प्रदेशाध्यक्ष धनखड यांनी केलेल्या विधानाचा समाचार घेतना शिवसेनेने (UBT) पंतप्रधान नरेंद्र मोदींना खडेबोल सुनावले आहेत.
सामना अग्रलेखात म्हटलं आहे की, “मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हरयाणात महिलांची उंची वाढली आहे. अलीकडच्या काळात आपल्या बहिणींची उंचीदेखील दोन-दोन इंचांनी वाढली आहे, असा दावा हरयाणा भाजपचे अध्यक्ष ओमप्रकाश धनखड यांनी केला आहे.”
हेही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा म्हणाले मला पक्षात पद द्या, शरद पवारांनी थेट…
“भारतीय जनता पक्षाने ‘अंधभक्त’ नावाची एक मानवी जमात नव्याने निर्माण केली आहे. त्यांचा विज्ञान, संशोधन, आधुनिकता वगैरेंशी काहीच संबंध नाही. मोदींची सत्ता आल्यापासून देशात भोंदूगिरी, बुवाबाजी वगैरे गोष्टींना महत्त्व मिळाले आहे. ज्या देशाचे पंतप्रधान गटाराच्या नाल्यातून ‘गॅस’ निर्माण करण्याची भाषा करतात व अंधभक्त माना डोलावतात, त्या देशाने आधुनिकतेची कास सोडून पुन्हा बाबा आदमच्या जमान्याचा मार्ग निवडलेला दिसतो”, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेने लगावला आहे.
“जर महिलांची उंची वाढली असेल तर मग गगनाला भिडलेल्या महागाईची, बेरोजगारीची उंची का कमी होऊ नये? मणिपुरात हिंसाचाराची आग भडकली आहे. त्या आगीवर शांततेचे पाणी ओतण्याची उंची मोदी सरकारने का गाठू नये? मोदी युगात भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीने टोकाची उंची गाठली”, असा घणाघात शिवसेनेने केला आहे.