“फडणवीसांची हरकाम्या करून ‘लायकी’ काढली हे…”; ठाकरे गटाचा वर्मावर ‘बाण’
देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावे असे विधान संजय शिरसाट यांनी केले. त्यावरून शिवसेनेने (यूबीटी) कोपरखळ्या लगावल्या आहेत. ठाकरे गटाने फडणवीसांना डिवचत शिंदेंनाही लक्ष्य केले आहे.
ADVERTISEMENT

Uddhav Thackeray On Devendra Fadnavis : “शिंदे-पवार प्रकरणात भाजपची पुरती ‘फजीहत’ झाली असून फडणवीस यांच्या नेतृत्वाची चमक साफ उतरली आहे. त्यामुळे त्यांना केंद्रात तरी स्थान मिळेल काय? हा प्रश्नच आहे”, असे म्हणत शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांच्या वर्मावर बाण डागला आहे. देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाल्यापासून विरोधकांकडून त्यांना डिचवलं जात आहे. त्यातच शिवसेना नेते शिरसाट यांनी केलेल्या विधानावर बोट ठेवत शिवसेनेने पुन्हा एकदा वार केला आहे. (Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Targeted Devendra Fadnavis. Thackeray faction said Delhi needs Fadnavis leadership.)
‘फडणवीसांची कपॅसिटी’ या मथळ्याखाली सामनामध्ये अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे. या अग्रलेखातून शिवसेनेने (यूबीटी) देवेंद्र फडणवीसांना चिमटे काढले आहेत.
“देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात राहू नये, त्यांनी केंद्रात जावे, अशा सूचना सरकारातील शिंदे गटाने केल्या आहेत. शिंदे मुख्यमंत्री राहावेत, असे या गटाचे म्हणणे आहे. दुसऱ्या बाजूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की, फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्याच वेळी अजितदादा गटाचे धर्मराव बाबा अत्राम यांनी घोषणा केली की, ‘अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होत आहेत.’ छगन भुजबळ यांनीही अजितदादा मुख्यमंत्री होतील यास दुजोरा दिला आहे. एकंदरीत महाराष्ट्रात याक्षणी तीन-तीन मुख्यमंत्री घोड्यावर बसले आहेत, पण घोडा काही पुढे सरकायला तयार नाही”, असं भाष्य सामना अग्रलेखात करण्यात आलं आहे.
फडणवीसांची लायकी निघाली -शिवसेना (यूबीटी)
शिवसेनेने (यूबीटी) पुढे म्हटलं आहे की, “शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट यांनी सांगितले, ‘फडणवीस यांचे काम उत्कृष्ट आहे, त्यांनी केंद्रात जावे.’ फडणवीसांवर ही काय वेळ आली आहे? महाराष्ट्रातील यत्किंचित लोक त्यांना केंद्रात जाऊन काम करण्याचा सल्ला देत आहेत. फडणवीसांची लायकीच या प्रकरणात निघाली”, अशा शब्दात ठाकरे गटाने फडणवीसांवर प्रहार केला आहे.