एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाच म्हणाले... माझ्याकडे 35 आमदार, विचार करा आणि मला काय ते सांगा!

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा झाली असून शिंदे यांनीच मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम दिला आहे.
एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंनाच म्हणाले... माझ्याकडे 35 आमदार, विचार करा आणि मला काय ते सांगा!
telephone conversation was held with eknath shinde and uddhav thackeray insisted on patching up with bjp

मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी 35 आमदारांच्या जोरावर महाविकास आघाडी सरकारविरोधात बंडाचा झेंडा फडकवला आहे. ज्यामुळे शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली आहे. या सगळ्या प्रकरणात आता सगळ्यात मोठी बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे, एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन तब्बल 20 मिनिटं फोनवर बातचीत झाली. यावेळी एकनाथ शिंदेंनी थेट अल्टिमेटमच दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी थेट सूरतमध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. चर्चेनंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुनच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं करुन दिलं. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, 'माझ्याकडे 35 आमदार आहेत. त्यामुळे जर आपण भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असाल तर पक्ष फुटणार नाही. यावर विचार करा आणि मला काय ते सांगा.' असा अल्टिमेटमच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

एकनाथ शिंदे-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन नेमकी काय चर्चा झाली?

मिंलिद नार्वेकर यांनी थेट सूरतमधील ला मेरिडियन हॉटेल गाठून एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. यानंतर नार्वेकर यांनी आपल्या फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करुन दिलं.

साधारण 20 मिनिटं एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं.

यावेळी सुरुवातीलाच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की, आपण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यासोबतची सत्ता सोडून भाजपसोबत सत्ता स्थापन करावी अशी अट घातली. यावर मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंना मुंबईत येऊन चर्चा करण्याचं आवाहन केलं.

यावर मुख्यमंत्र्यांना शिंदेंनी सांगितलं की, माझ्याकडे 35 आमदार आहेत. जर आपण भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच आपण शिवसेनेत कायम राहू. मी या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे विचार करा आणि काय ते मला कळवा. असं एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना यावेळी सांगितलं आहे.

'मी पक्ष सोडलेला नाही, कोणताही पक्ष स्थापन केलेला नाही. कोणत्याही कागदावर सही केलेली नाही. पक्षाच्या विरोधात बोलललो नाही. असं असताना विधिमंडळाच्या गटनेते पदावरुन का काढण्यात आलं?' असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

तसंच यावेळी एकनाथ शिंदे यांनी असंही सांगितलं की, 'मी मुख्यमंत्री पदाबद्दल देखील काही बोललेलो नाही. माझी भूमिका एवढीच आहे की, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपचं सरकार स्थापन व्हावं. एवढीच भूमिका आहे. ती मी मांडली तर त्यात गैर काय?'

तसंच एकनाथ शिंदे यांनी काही शिवसेना नेत्यांबद्दलही तक्रारी केल्या. त्यात प्रामुख्याने त्यांनी संजय राऊत यांच्याविषयी त्यांनी तक्रार केली आहे. संजय राऊत यांच्याविषयी बोलताना शिंदे म्हणाले की, 'राऊत यांनी मला फोन केले माझ्याशी व्यवस्थित बोलत आहेत पण ते जेव्हा प्रसार माध्यमांपुढे बोलत आहेत तेव्हा ते माझ्यावर टीका करत आहेत.'

अशा स्वरुपाची चर्चा एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात झाली असल्याचं समोर आलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in