फडणवीस कंस मामा?; अंधेरीची पोटनिवडणूक जिंकल्यानंतर ठाकरेंनी डिवचलं, शिंदेंवरही डागले बाण

अंधेरी पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर सामना अग्रलेखातून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्यात आलाय.
Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis
Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक पार पडली. शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके मोठ्या मताधिक्यानं विजयी झाल्या. अंधेरी पोटनिवडणूक विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यावर निशाणा साधलाय.

अंधेरीच्या पोटनिवडणुकीवर सामना अग्रलेखात काय म्हटलंय?

उद्धव ठाकरे संपादक असलेल्या सामनात म्हटलंय, "पोटनिवडणुकीच्या आधी मिंधे गट शिवसेनेतून बाहेर पडला. भाजपबरोबर सरकार स्थापन करून त्यांनी शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेतले. म्हणजे भाजपने मिंधे गटाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा निशाणा साधला. धनुष्यबाण गोठवून भाजप व त्यांच्या मिंध्यांना विकृत आनंद मिळाला तरी मुंबईची जनता मात्र शिवसेनेच्या पाठीत झालेले घाव पाहून खवळून उठली."

"महाराष्ट्राची परंपरा, संस्कृती, माणुसकी अशा शब्दांच्या टिचक्या मारून भाजपने माघार घेतली होती ती फक्त मुंबईत पहिल्याच निवडणुकीत बेअब्रू होऊ नये म्हणून. मुळात अंधेरी पोटनिवडणूक आपणास लढायची आहे, असा वाद निर्माण करून भाजपपुरस्कृत मिंधे गटाने धनुष्यबाणावर दावा लावला व निवडणूक आयोगाने परंपरा, इतिहास, खरे-खोटेपणाचे भान न ठेवता शिवसेना हे नाव व धनुष्यबाणच गोठवले. ही गोठवागोठवी करून भाजप व त्यांच्या मिंध्यांनी निवडणुकीच्या मैदानातून पळ काढला."

Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis
Andheri bypoll election results : ऋतुजा लटके अंधेरीच्या आमदार, 'नोटा'ने अपक्षांवर केली मात

"आमची मनापासून इच्छा होती, भाजप व त्यांच्या मिंधे गटाचे उमेदवार या निवडणुकीत उतरायलाच हवे होते. म्हणजे मुंबईत आवाज आणि गर्जना कोणाची याचा फैसला लागला असता. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडी म्हणून ऐक्य राखले. शिवसैनिकांबरोबर दोन्ही काँग्रेसचे कार्यकर्ते मनापासून कामास लागले. मुस्लिम समाज असेल नाहीतर ख्रिस्ती बांधव, सगळेच मतदानास उतरले. मराठी जनांची एकजूट तर अभेद्यच राहिली. हृदयात धनुष्यबाण आणि हाती मशाल असे चित्र दिसले."

'नोटा'साठी नोटा वाटल्याचा आरोप, सामनात काय म्हटलंय?

"भाजप आणि मिंधे गटाने माघारीचे नाटक केले, पण प्रत्यक्षात ‘नोटा’च्या बुरख्याआड रडीचा डाव खेळले. माघारीनंतरही त्यांच्या अंगातले किडे वळवळतच होते. त्यातूनच लोकांनी मतदान केंद्रावर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे, असे प्रयत्न त्यांनी जाणीवपूर्वक केले. वास्तविक, कायद्यानुसार ‘नोटा’चा प्रचार करता येत नाही. ‘नोटा’ हा पूर्णपणे ऐच्छिक विषय आहे. तरीही ‘नोटा’चा प्रचार केला गेला. लोकांनी मतदान केंद्रांवर जाऊन ‘नोटा’चे बटण दाबावे यासाठी काही ‘खोकी’ खर्चण्यात आली. त्यामुळे खोके सरकार आपल्या नामकरणास पुरेपूर जागले."
Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis
Andheri bypolls results : सर्वात कमी मतं कुणाला मिळाली? पोटनिवडणुकीत 6 उमेदवारांचं काय झालं?

"या पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का कमी होता. पण भाजप किंवा लाचार मिंधे गटाचा उमेदवार असता तर जनता अधिक जोमाने व त्वेषाने मतदान केंद्रावर पोहोचली असती. मतदानाचा आकडा 60 टक्क्यांवर गेला असता व मिंध्यांच्या बुडास मशालीचे चटके बसले असते. अर्थात उद्याच्या मुंबई, ठाणे, महानगरपालिकेत जनतेचा कौल कोठे आहे त्याची ही नांदी आहे."

अंधेरी पोटनिवडणूक : देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका

"मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार ते फक्त ईश्वरालाच ठाऊक,' असे गमतीचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी मध्यंतरी केले. पेच व कारस्थाने करणाऱ्यांना सोयीनुसार ईश्वर आठवतो हेच खरे! पण ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे."
Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis
NOTA ला जास्त मतं पडली असती तरीही ऋतुजा लटकेंचा विजय निश्चित होता! समजून घ्या कारण

"मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत. अंधेरीच्या पोटनिवडणुकीचा निकाल तेच सांगतोय."

"मशाली’च्या पहिल्या विजयाने मिंधे गट व त्यांच्या पोशिंद्यांची पोटदुखी वाढली आहे. तथापि, राज्याची जनता मात्र आज पुन्हा दिवाळी साजरी करीत आहे. दुष्मनांना कात्रजचा घाट दाखविण्यासाठी शिवरायांनी मशालीचाच वापर केला होता. तो इतिहास जरा आमच्या विरोधकांनी समजून घेतला पाहिजे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या रणात उतरून ज्या शिवसैनिकांनी, मतदारांनी शिवसेनेस विजय मिळवून दिला त्यांचे आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत."
Uddhav Thackeray, Eknath Shinde And Devendra fadnavis
ऋतुजा लटके यांच्या विजयाचे खरे शिल्पकार देवेंद्र फडणवीस! अनिल बोंडेंनी सांगितलं कारण

"आम्ही त्या शिवसेनाप्रेमींना साष्टांग दंडवत घालून महाराष्ट्राचा स्वाभिमान राखल्याबद्दल लाख लाख धन्यवाद देत आहोत. आम्ही समोरून वार करणारे आहोत, पण शत्रूने वार वर्मी बसण्याआधीच रणातून पळ काढला. अशा पळपुटय़ांनी विजयी मशालीवर उगाच गुळण्या टाकण्याचे प्रयत्न करू नयेत. विजयाची ही मशाल अशीच पेटत राहील! विरोधकांची ‘बुडे’ जाळत राहील!! राजकीय चिता पेटवत राहील", असा इशारा सामना अग्रलेखातून ठाकरेंनी दिलाय.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in