भगतसिंह कोश्यारींवर कारवाई होणार का? पंतप्रधानांच्या भेटीनंतर काय म्हणाले उदयनराजे?

वाचा सविस्तर बातमी काय म्हटलं आहे उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर?
Udyanraje Bhosle Reaction about Governor Bhagat sing Koshyari After His Meeting with PM Narendra Modi
Udyanraje Bhosle Reaction about Governor Bhagat sing Koshyari After His Meeting with PM Narendra Modi

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानजनक वक्तव्य केलं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात विरोधाची लाट पाहण्यास मिळाली. छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशात आज उदयनराजेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीत काय घडलं ते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना सांगितलं आहे.

काय म्हटलं आहे उदयनराजेंनी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं शेड्युल व्यस्त असल्याने राज्यपालांच्या विषयावर त्यांच्याशी बोलणं झालं नाही. मात्र पंतप्रधान कार्यालयात मी पत्र दिलं आहे. आम्ही आमच्या भावना पंतप्रधान कार्यालयाला कळवल्या आहेत. कोणत्याही मुद्द्यावर तेढ निर्माण होऊ नये ही आमची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाची अस्मिता आहेत. त्यांच्याबाबत बोलताना विचार करून बोललं पाहिजे. राज्यपाल हे मोठं पद आहे. त्या पदावरच्या व्यक्तीने कोणत्याही महापुरूषांबाबत अवमानजनक वक्तव्य करू नये. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं त्यानंतर असंतोष पाहण्यास मिळाला आहे. आता या सगळ्यावर तोडका निघाला पाहिजे. राज्यातील परिस्थिती निवळण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाला सांगितलं आहे. आता ते योग्य ती कारवाई करतील अशी खात्री आहे असं उदयनराजेंनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेड्युल व्यस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं शेड्युल व्यस्त असलेल्या त्यांना आज भेटायला आलेल्या २६ खासदारांना भेटण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ देता आला नाही. मात्र त्यांच्या कार्यालयाकडे तक्रार केली आहे. जे उत्तर दिलं जाईल त्याची माहिती पत्रकारांना देऊ असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

राज्यपालांचा विषय पंतप्रधानांकडे गेलाच असेल. प्रत्येक राज्यात काय चाललं आहे याची माहिती पंतप्रधानांकडे असणारच. त्यांना गुप्तवार्ता विभागाकडून माहिती मिळाली असेलच. राज्यपालपद हे छोटं नाही. त्यांना हटवण्याची काही प्रक्रिया असेल. त्यानुसार पंतप्रधान आणि राष्ट्रपती निर्णय घेतील. हा कुठल्याही आघाडीचा किंवा पक्षाचा विषय नाही. राजकीय हेतूने याकडे पाहू नये असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

राज्यपालांनी काय म्हटलं होतं शिवरायांबाबत?

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातले आदर्श होते. नव्या काळातले आदर्श बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आहेत हे वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. महापुरूषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही त्यांची पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा त्यांनी अशी वक्तव्यं करून चर्चांचा आणि वादांचा धुरळा उडवून दिला आहे. उदयनराजेंनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in