
Sushma Andhare on Chitra Wagh Vs Urfi Javed Controversy : भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघांनी उर्फी जावेदविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या कपड्यांवरून चित्रा वाघांनी थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे तक्रार केलीये. तसेच थोबडावण्याचा इशाराही दिलाय. या वादात आता शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतलीये. सुषमा अंधारेंनी कंगना रणौत, अमृता फडणवीसांचा उल्लेख करत चित्रा वाघांना काही सवाल केले आहेत.
लक्षवेधून घेणाऱ्या कपड्यांमुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या उर्फी जावेदला अटक करण्याची मागणी भाजप महिला मोर्चा आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली. चित्रा वाघांनी अटक करण्याची मागणी केल्यानंतर उर्फी जावेदनंही चित्रा वाघांना प्रत्युत्तर दिलं. चित्रा वाघ यांनी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतल्यानंतर उर्फीने त्यांना संपत्ती जाहीर करण्याचं आव्हान दिलं.
उर्फी जावेदविरुद्ध आणखी आक्रमक भूमिका घेऊ आणि समोर आली तर थोबडावेन आणि नंतर ट्विट करून सांगेन असा दम चित्रा वाघांनी दिला. आता या वादात सुषमा अंधारेंनी उडी घेतलीये. सुषमा अंधारेंनी काही सवाल करत चित्रा वाघ यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय.
सुषमा अंधारे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केलीये. या पोस्टमध्ये सुषमा अंधारेंनी कंगना रणौत, अमृता फडणवीस, केतकी चितळे यांचे बोल्ड फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना काही सवाल केले आहेत.
सुषमा अंधारे फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, "मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट वाटतं. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो फार फार तर सलवार सूट."
"पण म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. कारण ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटतं तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा इतकच...", असं सुषमा अंधारेंनी म्हटलंय.
त्या पुढे म्हणतात, "अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलूया पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची भाषा केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी? उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला?", असा सवाल सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांना केलाय.
"आणि जर उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का? किंवा त्यांना (म्हणजे केतकी चितळे, कंगना राणावत किंवा अमृता फडणवीस यांना) मारहाणीची भाषा कराल का?", असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला आहे.
"नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धझोतात, चर्चेत राहण्या साठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल", असं म्हणत सुषमा अंधारेंनी चित्रा वाघांवर टीकास्त्र डागलंय.