उद्धव ठाकरेंना सल्ला, एकनाथ शिंदेंना ऑफर; आंबेडकरांच्या मनात नेमकं काय?
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वंचित बहुजन आघाडीसोबत राजकीय आघाडी करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
ADVERTISEMENT

‘महाविकास आघाडीच्या नादी लागू नका, अन्यथा तुमचा बळी जाईल’ असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. भांडूपमध्ये झालेल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.याच भाषणामध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देखील एकत्र येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या मनात नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घ्यायचं की नाही याबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही. वंचित बहुजन आघाडी हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मित्र पक्ष असल्याने ठाकरेंच्या वाट्याला येणाऱ्या जागांमधून त्यांनी वंचितला जागा द्याव्या, असा मविआच्या नेत्यांचा सूर आहे. 10 महिन्यांवर लोकसभेची निवडणूक आल्याने मविआच्या जागावाटपाच्या चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत. आता यात वंचितला सोबत घेतलं जाणार की नाही असा प्रश्न आहे. त्याचबरोबर जागा वाटपावरुन मविआत कुरबुरी देखील सुरु झाल्या आहेत.
अशातच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादात शिवसेनेचा बळी जाऊ देऊ नका असं प्रकाश आंबेडकर म्हणतायेत. एकप्रकारे उद्धव ठाकरेंना मविआतून बाहेर पडण्यासाठीच प्रकाश आंबेडकर सुचवत आहेत. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यावर शरद पवारांनी सध्या तरी बोलणं टाळलं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंना कोणती ऑफर दिली?
दुसरीकडे याच सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांनी एकनाथ शिंदेंच्या भेटीबाबतही अनेक खुलासे केले आहेत. रिक्षावाला मुख्यमंत्री झाल्याचा आनंद असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. त्याचबरोबर शिंदेंनी भाजपची साथ सोडून वंचितसोबत यावं, अशी खुली ऑफरही आंबेडकरांनी यावेळी दिली. आंबेडकर या भाषणात काय म्हणाले तेच विधान नेमकं काय?