संजय राऊतांवर सुरु असलेल्या ईडीच्या कारवाईवर अजित पवार यांनी दिली अशी प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संजय राऊतांवर सुरु असलेल्या कारवाईवर आपले मत व्यक्त केले.
Ajit Pawar Says  ED action On Sanjay Raut
Ajit Pawar Says ED action On Sanjay Raut

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी रविवारी सकाळपासून ईडीचे एक पथक दाखल झाले आहे. पात्र चाळप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत पडल्याची माहिती मिळत आहे. गेल्या पाच ते सहा तासांपासून सलग ही चौकशी सुरु आहे. याबाबत आता विविध स्तरावरून प्रतिक्रिया यायला सुरु झाल्या आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील संजय राऊतांवर सुरु असलेल्या कारवाईवर आपले मत व्यक्त केले. ईडीला देशातील कोणत्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी दौरा पवार करत आहेत. रविवारी ते बीड जिल्ह्यात होते. या दरम्यान माध्यमांनी त्यांना संजय राऊत यांच्यावर सुरू असलेल्या ईडीच्या चौकशीबाबत प्रश्न केला. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, अनेक संस्था आणि व्यक्तींना ईडीच्या अनेक वेळा नोटीस आलेल्या आहेत. त्या यंत्रणांना स्वायत्तता दिलेली आहे. त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे, असं पवार म्हणाले.

अधिकराबाबत बोलताना पवार म्हणाले आयटी असेल ईडी असेल किंवा राज्य सरकारचं एसीबी असेल, सीआयडी असेल किंवा पोलीस क्राईम ब्रँच असेल या सर्व वेगवेगळ्या विभागांमध्ये काही जर तक्रार आली असेल तर त्याची चौकशी करण्याचा अधिकार त्यांना आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा या यंत्रणा का येतात त्या संदर्भात जास्त संजय राऊत सांगतील असेही अजित पवार म्हणाले.

संजय राऊतांवर सुरु असलेल्या कारवाईवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?

ईडीकडून सुरू असलेल्या संजय राऊतांच्या चौकशीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "संजय राऊतांच्या घरी रेड झालेली आहे. मध्यंतरी त्यांना समन्स आलेलं होतं. मला विश्वास आहे की, कुठलीही एजन्सी जेव्हा आपल्याकडे येते, तेव्हा त्यांना सहकार्य करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. संजय राऊत त्यांना सहकार्य करतील.’’ असं सुळे म्हणाल्या.

ईडीच्या माध्यमातून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न होतोय का? असा आरोप विरोधकांकडून सातत्यानं होतोय. यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "याबाबतची आकडेवारीच हेच सांगतेय. सातत्याने आम्हाला हे जाणवतंय. हे होत आहे. आम्ही काँग्रेस पक्षासोबत उभे राहिलो. यासदंर्भात आम्ही संसदेत निदर्शनं करू कारण देशातील सर्वोच्च ठिकाण आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी यांना अनेकवेळा बोलावण्यात आलं. त्यांनी सहकार्य केलं. मला पूर्ण विश्वास आहे की, एजन्सीला जसं सहकार्य गांधी कुटुंबाने केलं, तसंच संजय राऊत करतील," अशी भूमिका त्यांनी मांडली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in