PM Modi in Pune : ‘सर्जिकल स्ट्राईक’… शरद पवारांनी मोदींना कोणता इतिहास सांगितला?
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शरद पवारांनी भाषण केले. या भाषणात त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले.
ADVERTISEMENT

Sharad Pawar Speech in Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनी सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख केला. त्याचबरोबर इतिहासाला उजाळा दिला. यावेळी बोलताना पवारांनी पत्रकारिता स्वतंत्र असायला हवी म्हणत माध्यम स्वातंत्र्याचा मुद्दा अधोरेखित केला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “मी पंतप्रधान मोदींना सांगू इच्छितो की, देशात पुणे शहराचं वेगळं महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या इतिहास संपूर्ण जगाला माहिती आहे. शिवाजी महाराजांचा जन्म याच जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. याच शहरातील लाल महलात त्यांचं बालपण गेलं. त्यांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं.”
शरद पवारांनी सांगितलं हिंदवी स्वराज्याचं महत्त्व
पवार पुढे बोलताना म्हणाले, “या देशात अनेक राजे, राजवाडे होऊन गेले. त्यांचं राज्य त्यांचं संस्थान त्यांच्या नावाने ओळखले जायचं. देवगिरीचं यादवांचं संस्थान असेल, मोगलांचं दिल्लीचं संस्थान. अनेकांची संस्थान या देशात होऊन गेली. पण, शिवछत्रपतींचं काम वेगळ्या दिशेने झालं. त्यांनी राज्य उभं केलं, पण ते भोसल्यांचं राज्य नव्हते. ते हिंदवी स्वराज्य होतं. ते रयतेचं राज्य होतं. त्यांचं रयतेचं राज्य प्रस्थापित करण्यासंबंधीचं काम या पुणे शहरात झाला. हा पुण्याच्या गौरवशाली इतिहासाचा भाग आहे.”
वाचा >> Narendra Modi Pune visit :शरद पवार एकटेच बसले, मोदी पुण्यात आल्यानंतर काय घडलं?
“अलिकडेच्या काळात या देशाने आणि देशाच्या जवानांनी देशाचं रक्षण करण्यासाठी एक प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक केला होता. सर्जिकल स्ट्राईकची चर्चा आता होते, पण लाल महलात शाहिस्ते खानाने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर या देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक हा शिवछत्रपतींच्या काळात झाला. ही गोष्ट आपण कधी विसरू शकत नाही”, असं म्हणत शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींना चिमटा काढला.