Pawar Family: अजितदादांच्या बंडानंतर पक्ष, पवार कुटुंबात फूट पण ‘इथे’ मात्र सगळे एकत्र!
अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फूट पडल्याचं सकृतदर्शनी दिसतं आहे. पण असं असलं तरीही अनेक संस्थांचा कारभार हेच पवार कुटुंब एकत्रितपणे सांभाळणार असल्याचं पाहायला मिळतंय.
ADVERTISEMENT

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP)सध्या मोठी फूट पडली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वात अनेक दिग्गज नेत्यांनी बंड करत शरद पवार (Sharad Pawar) यांची साथ सोडली. पण याच बंडासोबत पवार कुटुंबीयांमध्ये पहिल्यांदाच फूट पडल्याचं समोर आलं आहे. आजवर अनेक राजकीय संकटं आली तरी पवार कुटुंबीय हे कायम अभेद्य असायचं. काहीही झालं तर पवार कुटुंबातील मतभेद हे कायम चार भिंतींच्या आतच राहिले. पण आता पहिल्यांदाच त्याच्या कुटुंबातील वाद हे चव्हाट्यावर आले आहेत. स्वत: अजित पवारांनी शरद पवारांना त्यांचं वय झालं असून तुम्ही निवृत्त व्हा असा जाहीर सल्ला देऊन टाकला. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) ‘आपल्या बापाचा नाद करायचा नाय..’, असा इशारा देत राजकीय लढाईसाठी कंबरही कसली. (ajit pawar rebellion split ncp and pawar family will jointly manage affairs many institutions vidya pratishthan yashwantrao chavan center sharad pawar supriya sule)
दरम्यान, राजकीय पातळीवर अनेक गोष्टी सुरू असताना आता काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित झाले आहेत. जे सहकार, बँकिंग क्षेत्रातील पवारांच्या वर्चस्वाबाबत आहेत. या क्षेत्रांमध्ये विशेषत: बारामतीत अनेक संस्थांवर शरद, पवार, अजित पवार, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे हे कार्यरत आहेत. पण आता राजकीय आणि कौंटुबिक पातळीवर जी फूट पडली आहे. त्यानंतर या संस्थांचा कारभार दोन्ही पवार कसा हाकणार असा प्रश्न बारामतीसह अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे.
सगळ्यात आधी जाणून घेऊयात कोणकोणत्या संस्थांवर पवार कुटुंबीय एकत्रितपणे कार्यरत आहेत:
1. विद्या प्रतिष्ठान: विद्या प्रतिष्ठानची निर्मिती झाली साधारण 1992 ते 1998 च्या काळात. या काळात मराठी माध्यमिक शाळा, इंग्रजी माध्यमाची शाळा, कॉलेज, लॉ कॉलेज, बी. एड. कॉलेज यांची टप्प्याटप्प्याने सुरुवात झाली. विद्या प्रतिष्ठानचा संपूर्ण परिसर हा तब्बल 27 एकरमध्ये पसरलेला आहे. पुणे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी हे बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शिक्षण घेण्यासाठी प्राधान्य देत असल्याचं चित्र गेली अनेक वर्ष पाहायला मिळालं आहे.
आता याच विद्या प्रतिष्ठानचा नेमका कारभार कोण-कोण सांभाळतो हे आपण पाहूयात.
विद्या प्रतिष्ठान या संस्थेचे अध्यक्ष हे शरद पवार आहेत. तर याच संस्थेचे विश्वस्त अजित पवार हे आहेत. तर याशिवाय शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या संस्थेच्या सदस्या आहेत. तसेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील या संस्थेच्या सदस्या आहेत. तर अजित पवारांचे पुतणे योगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानेच कोषाध्यक्ष आहेत.